मुंबई: नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानला विविध प्रकारच्या वाड्मयीन उपक्रमांच्या आयोजनासाठी यंदाच्या आर्थिक वर्षापासून दहा लाख रुपये निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मराठी साहित्याचा प्रसार, प्रचार आणि संवर्धनासाठी मराठी साहित्य महामंडळाच्या विविध संस्थांनाही दहा लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने १९९० मध्ये स्थापन झालेल्या नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे साहित्य, कला, नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. साहित्यिक, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम या संस्थेने केले आहे. तरुण लेखक आणि कलाकारांना या संस्थेने प्रोत्साहन दिलेले आहे. याच संस्थेच्या वतीन ‘जनस्थान’ हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो. संस्थेच्या या कार्याची दखल घेऊन शासनाने विविध प्रकारच्या वाडमयीन उपक्रमांसाठी दहा लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी साहित्याचा प्रसार आणि संर्वधन करणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, विदर्भ साहित्य संघ नागपूर, मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजी नगर, कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर या सात संस्थांना दरवर्षी दहा लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. या संस्था नियतकालिकांचे प्रकाशन, विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन, मराठी ग्रंथ निर्मितीसाठी विविध पारितोषके वितरण, संदर्भ ग्रंथांचे प्रकाशन सारख्या विविध वाड्मयीन उपक्रमांचे आयोजन करतात. त्याची दखल शासनाने घेतली आहे.
