मुंबई: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने रोख पारितोषिक योजनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसह राष्ट्रीय खेळ, खेलो इंडिया तसेच दिव्यांगांच्या सहा महत्त्वाच्या स्पर्धांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांच्या पारितोषिक रकमेतही भरीव वाढ करण्यात आली.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकासाठी आता ७ लाख रुपये, रौप्यपदकासाठी ५ लाख आणि कांस्यपदकासाठी ३ लाख रुपये मिळणार आहेत. यापूर्वी ही रक्कम अनुक्रमे पाच लाख, तीन लाख आणि दीड लाख रुपये होत्या. त्यात दोन व दीड लाखाने वाढ करण्यात आली. जागतिक पातळीवरील पदक विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकासाठी अनुक्रमे १०, ७ आणि ५ लाख रुपये, तर खेलो इंडिया स्पर्धेसाठी ३, २ आणि १ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा ऑलिम्पिकमधील पारितोषिक रकमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. सुवर्णपदकासाठी ५० लाख, रौप्य पदकासाठी ३० लाख आणि कांस्यपदकासाठी २० लाख रुपये मिळतील.

टेनिसच्या चारही ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धांतील विजेत्यास तीन कोटी, तर उपविजेत्यास दोन कोटी रुपये मिळणार आहेत. बॅडमिंटनमधील थॉमस, उबर आणि सुदीरमन कप तसेच हॉकीतील अझलन शाह कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि सुलतान जोहर कप यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. खेळाडूंच्या यशामागील मार्गदर्शकांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

खेळाडूच्या पारितोषिकाच्या १० टक्के रक्कम मार्गदर्शकांना देण्यात येईल. जास्तीत जास्त तीन मार्गदर्शकांमध्ये ही रक्कम ३०:३०:४० या प्रमाणात विभागली जाणार आहे. कर्णबधीर, अंध आणि विशेष ऑलिम्पिकसह विविध दिव्यांग क्रीडा स्पर्धांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी देशांची संख्या लक्षात घेऊन पारितोषिकाची रक्कम २५, ५० किंवा १०० टक्के देण्याची नवी पद्धत लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक खेळाडूंना या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.