DCM Sunetra Pawar First Cabinet Meeting: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांनी आज (१० फेब्रुवारी) मंत्रालयात पदभार स्वीकारला. उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील काही महत्वाचे निर्णय
पुणे जिल्ह्यात होणाऱ्या पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. प्रकल्पाला गती देण्यासाठी सहा हजार कोटींचे कर्जही मंजूर करण्यात आले आहे. राज्यात माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान राबवले जाणार आहे. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात एमआयडीसीला जमीन दिली जाणार आहे. कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमसाठी शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. बारामती जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत कटफळ येथील क्रीडा सुविधांसाठी ७५.१३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे.
इंदापूरात रोजगाराच्या नव्या संधी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत इंदापूर तालुक्यातील रत्नपुरी मळ्यातील एक हजार एकर जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. हा निर्णय अजित पवारांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पडलेले ठोस पाऊल आहे. यामुळे इंदापूर, बारामती आणि पुणे जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळाव्यात हा उद्देश असल्याचे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
पदभार स्वीकारताना भावूक
सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. खूर्चीवर बसण्यापूर्वी भावनिक झालेल्या सुनेत्रा पवार यांनी खूर्चीला नमस्कार केला. यावेळी पूत्र पार्थ पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकेर, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाचे विविध नेते, मंत्री उपस्थित होते. सुनेत्रा पवार पदभार स्वीकारत असताना पार्थ पवारही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
दादांची जागा कोणी घेऊ शकत नाही पण…
सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दादांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असेही भावनिक उद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले.
