कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन आणि शिवसेनेने आमदारकीची उमेदवारी नाकारल्याने राजीनामा दिलेले सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या रूपाने आता राज्य मंत्रिमंडळातील दोन जागा रिक्त झाल्या असून त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, कृषिमंत्रीपदाचा अतिरिक्त  कार्यभार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची आणि महामंडळावरील नियुक्त्यांची चर्चा सुरू होत असे. नंतर ती फोल ठरत असे. पण आता राज्यातील राजकीय परिस्थिती बदलत आहे. त्याचबरोबर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाने एक महत्त्वाचे खाते रिक्त झाले आहे. भाजपच्या वाटय़ाची जागा रिक्त  झाल्याने तूर्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे पाटील यांच्याकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम यांच्यासह कृषी अशी तीन खाती आली आहेत.  खरीप हंगाम सुरू होत असल्याने पूर्णवेळ कृषिमंत्र्याची गरज लागणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर कृषिमंत्रीपद भरण्यात येणार असल्याचे समजते.

त्याचबरोबर मुंबई पदवीधर मतदारसंघातील विधान परिषदेवरील आमदार व सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे सावंत यांनी राजीनामा दिला आहे. ती जागाही भरावी लागणार आहे. त्यामुळे यंदा विधिमंडळ अधिवेशनाच्या आधी किंवा नंतर राज्य मंत्रिमंडळातील या रिक्त  जागा भरण्यात येतील.

राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपमध्ये पुन्हा एकदा महामंडळांवरील नियुक्त्यांचा विषय ऐरणीवर आला असून त्याबाबतची प्रलंबित घोषणाही होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पुढील मंत्री पश्चिम विदर्भातून : पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा भरताना भाजपला प्रादेशिक समतोलाचा विचार करावा लागेल. त्यामुळे बुलडाणा जिल्हा व आसपासच्या भागातूनच पुढील मंत्री निवडला जाऊ शकतो. खाते कोणते हा विषय वेगळा राहील. पण रिक्त जागा भरताना बुम्लढाणा किंवा आसपासच्या जिल्ह्य़ाचा प्राधान्याने विचार होईल, असे समजते.