केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ राज्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, यामध्ये भाजपसह मित्रपक्षांच्या सदस्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचे समजते. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी नवी दिल्लीमध्ये पोहोचले असून, ते भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा करून नावे निश्चित करण्यासाठीच ही भेट होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ७ किंवा ९ जुलैला होणार असून, त्याची तारीख आजच निश्चित करण्यात येणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडील महसूल, कृषी यासारखी महत्त्वाची खाती कोणाकडे द्यायची. त्याचबरोबर भाजपचे मित्रपक्ष असलेल्या पक्षांचे नेते महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे यांना मंत्रिमंडळात संधी द्यायची का, त्यांच्याकडे कोणती खाती द्यायची यावर मुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्यामध्ये होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मित्रपक्षांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सांगली आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांना राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळण्यासाठी तेथील नेत्यांचाही विस्तारावेळी विचार केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये नुकतेच उस्मानाबादमधून विधान परिषदेवर निवडून गेलेले भाजपचे ज्येष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर आणि सांगलीतील शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचे समजते.
येत्या १८ जुलैला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होते आहे. त्यामुळे त्या अगोदर मंत्रिमंडळ विस्तार करून नव्या मंत्र्यांना आपल्या खात्याचा कारभार व्यवस्थितपणे समजून घेता यावा, यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल.