राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील शपथ घेतलेले सर्व मंत्री दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी पोहोचले आहेत. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कामाला सुरुवात करण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण येथे आल्याचं आमदारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तब्बल महिनाभरानंतर मंगळवारी अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, भाजपा आणि शिंदे गटातील प्रत्येत नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. दरम्यान आता खातेवाटपावर सर्वांचं लक्ष आहे.

“शिवसेनाप्रमुख आमच्या ह्रदयात आहेत. शपथ घेताना लिहून दिलं आहे त्याप्रमाणेच वाचावं अशी सूचना असल्याने बाळासाहेबांचं नाव घेतलं नव्हतं. पण ते आमच्या मनात, ह्रदयात कायम आहेत,” असं शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितलं. “बाळासाहेबांची शिकवण आहे त्याप्रमाणे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण याचा आम्ही अवलंब करु,” असं दादा भुसे यांनी म्हटलं.

Maharashtra Cabinet: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, १८ मंत्र्यांनी घेतली शपथ, महिला नेत्यांना वगळल्याने आणि संजय राठोड यांना स्थान दिल्याने वाद

“ज्या बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहेत, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. बाळासाहेब आमचं ऊर्जास्त्रोत आहेत,” असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. मंगळवारी राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे.