मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार अखेर आज, मंगळवारी सकाळी ११ वाजता राजभवनावर होत आह़े  पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात २० ते २२ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आह़े  त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, संजय कुटे, राधाकृष्ण विखे-पाटील, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटातील दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई, बच्चू कडू आदींना संधी मिळण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी ३० जून रोजी झाला होता. तेव्हापासून गेले सव्वा-दीड महिना मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू होती. शिंदे सरकारची वैधता, अध्यक्षांची निवड आणि आमदार अपात्रतेच्या मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या याचिका प्रलंबित आहेत. दुसरीकडे, खरी शिवसेना कोणाची, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे प्रलंबित आहे. त्यामुळे हा विस्तार रखडल्याची चर्चा सुरू होती.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवार-रविवारी दिल्ली दौऱ्यावर असताना भाजप पक्षेश्रेष्ठींशी याबाबत सविस्तर चर्चा केली. न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निर्णय येण्यास काही कालावधी लागणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव आणि विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन लक्षात घेता विस्तार फार काळ लांबणीवर टाकणे उचित नव्हते. त्यामुळे छोटेखानी विस्तार करण्याचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून मंत्र्यांची यादी निश्चित केली असून, या नेत्यांना दूरध्वनीवरुन निरोप देण्याचे काम दिवसभर सुरू होते. भाजपकडून अतुल सावे, गणेश नाईक, चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश करण्याबाबत विचारविनिमय सुरू होता. मुंबई-ठाण्यातील नेत्यांना सोमवारी रात्री उशिरा निरोप देण्यात येत होते. अ‍ॅड. आशिष शेलार यांना पुढील काळात भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार की त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

भाजपला २४, तर शिंदे गटाला १८ मंत्रिपदे?

* सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापुढील कायदेशीर प्रश्न संपुष्टात येईपर्यंत मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार करू नये, असे भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी ठरविले आहे.

* त्यामुळे पहिल्या टप्प्यात भाजपच्या १२-१३ आणि शिंदे गटाच्या ९-१० मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. भाजपच्या वाटय़ाला एकूण २४ तर शिंदे गटाला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे.

* पण, मंगळवारच्या विस्तारानंतर काही महिन्यांनी उर्वरित जागा भरल्या जातील. तोपर्यंत भाजप आणि विशेषत: शिंदे गटातील इच्छुकांना मंत्रिपदाच्या आशेवर ठेवण्यात येईल, असे दिसत़े

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cabinet expansion today zws
First published on: 09-08-2022 at 05:07 IST