मुंबई : गडचिरोलीतील लोहखनिज वाहून नेणाऱ्या वाहनांना सुकर आणि बळकट वाहतूक व्यवस्थेचा पर्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नवेगाव मोर ते सुरजागड द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८५ किमीच्या या महामार्गाच्या संरेखनास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता मार्चमध्ये या महामार्गाच्या बांधकामासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण करून, भूसंपादन पूर्ण करुन चालू वर्षातच या प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीसीचे नियोजन आहे. तर हा प्रकल्प शक्य तितक्या लवकर पूर्ण करून सेवेत दाखल करण्याचेही नियोजन एमएसआरडीसीने केले आहे. हा महामार्ग सेवेत दाखल झाल्यास नवेगाव मोर ते सुरजागड प्रवास एका तासात शक्य होणार असून लोहखनिज वाहतूक सुकर होणार आहे.

सुरजागड टेकडीवरील खाणीतून लोहखनिज वाहतुकीसाठी सध्या रस्त्यांचे कोणतेही जाळे नाही. वाहतुकीसाठी योग्य सोय नाही. त्यामुळे अशा वाहतुकीसाठी मोठी कसरत करावी लागते आहे. तर दुसरीकडे लोहखनिज वाहतुकीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर नवेगाव मोर ते सुरजागड द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

८५ किमीच्या या महामार्गाचे संरेखन निश्चित करत यासंंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास, संरेखनास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता मिळाल्याने आता प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्यासह बांधकामासाठी निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दररोज अंदाजे ८ हजार वाहनांद्वारे लोहखनिज वाहून नेले जाते. आता लवकरच या वाहनांची वाहतूक सुकर होणार आहे. ३७०० कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गासाठी मार्चमध्ये निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापक संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. ८५ किमीपैकी अंदाजे ४.५ किमी लांबीच्या महामार्गाची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) असणार आहे. उर्वरित महामार्गाचे बांधकाम एमएसआरडीसी करणार आहे.

मार्चमध्ये निविदा प्रक्रियेस सुरुवात करत दुसरीकडे भूसंपादनास सुरुवात केली जाणार आहे. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण करत याच वर्षात कामास सुरुवात करण्याचे नियोजन एमएसआरडीसीचे आहे. तर हा महामार्ग पूर्ण होऊन सेवेत दाखल झाल्यास नवेगाव मोर ते सुरजागड प्रवास लोहखनिज वाहून नेणाऱ्या वाहनांना एका तासात पूर्ण करता येणार आहेच, पण हा महामार्ग समृद्धी महामार्गाचा विस्तार असल्याने लोहखनिज वाहनांसह इतर वाहनांना समृद्धी महामार्गावर पोहोचत त्याच मार्गाने नागपूर, वर्धा, अमरावतीसह मुंबई गाठणेही शक्य होणार आहे.

या महामार्गासाठी २३६ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार असून या प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रिया जलद आणि सोपी असणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. कारण, एकूण जमिनीच्या ६१ टक्के जमीन सरकारी आहे. ३० हेक्टर जमीन सरकारी आणि ११५ हेक्टर जमीन वन जमीन आहे. त्यामुळे या जमिनीचे संपादन करणे सोपे होईल. तर केवेळ ९१ हेक्टर खासगी जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यानुसार भूसंपादन शक्य तितक्या लवकर पूर्ण करत महामार्गाच्या बांधकामास सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.