मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभाग आणि टाटा रुग्णालयाच्या माध्यमातून ‘कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून व टाटा कर्करोग रुग्णालयाच्या तांत्रिक सहकार्याने राज्यात २६ ठिकाणी डे – केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जिल्हास्तरावर कर्करोग रुग्णांना सेवा उपलब्ध होणार आहे.
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी नुकतेच परेल येथील टाटा मेमोरियल रुग्णालयाला भेट दिली. त्या भेटीत “डे केअर” तांत्रिक सहकार्य व प्रशिक्षण याबाबत चर्चा झाली. यावेळी टाटा मेमोरियल केंद्राचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे मुंबईचे संचालक डॉ. सी. एस. प्रमेश, उपसंचालक डॉ शैलेश श्रीखंडे, उपसंचालक सिद्धनाथ लष्कर, रुग्णालय अधीक्षक डॉ. विनीत सामंत उपस्थित होते.
अलिकडच्या काळात कर्करोग रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचेवतीनेही राज्यभर कर्करोग तपासणी व उपचार मोहीम राबवली जात आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या माध्यमातून कर्करोग निर्मूलनाचे काम उत्तमपणे सुरू आहे. या दोन्ही संस्थानी एकमेकांच्या सहकार्याने ‘कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ करण्याचा राज्य सरकारचा निर्धार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.
त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून व टाटा कर्करोग रुग्णालयाच्या तांत्रिक सहकार्याने राज्यात २६ ठिकाणी डे – केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जिल्हास्तरावरील कर्करोग रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांच्या पॅकेजच्या दरामध्ये वाढ केली आहे. अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे. त्यामुळे अधिकाधिक रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. त्याचा कर्करोग रुग्णांनाही फायदा होईल. कर्करोगावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने विशेष मोहिमेअंतर्गत फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून राज्यभर महिलांची कर्करोग तपासणी मोहीम सुरू आहे.
कर्करोगाचे लवकर निदान होणे गरजेचे असल्याने तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवली जाईल. कर्करोग रुग्णांना उपचारांच्या पश्चातही आवश्यक सेवा देण्यात येईल. कर्करोगावर उपचार करणारे डॉक्टरही आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी आरोग्य विभागाच्या अभ्यास गटाला सूचना करतील. महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयानी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कर्करोग रुग्णांना उपचार पश्चात सेवा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
