मुंबई – राज्यात वाढत्या कर्करोगाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी रुग्णालये, कर्करोग तज्ज्ञ आणि सेवाभावी संस्थांनीही एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. कर्करोगाविरोधातील लढा केवळ उपचारापुरता मर्यादित नसून जनजागृती, लवकर निदान आणि प्रभावी उपचार या त्रिसूत्रीवर आधारित असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवा आयुक्तालयात आयोजित बैठकीत तज्ज्ञ डाॅक्टर्स, शासकीय व खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी, सेवाभावी संस्थांचे सदस्य तसेच दक्षिण कोरियातील आयएमबी संस्थेचे तज्ज्ञ दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्यात कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद करताना आबिटकर म्हणाले की, कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता अधिक असते.

यासाठी राज्यातील आठही परिमंडळांत कर्करोग निदान व्हॅनच्या माध्यमातून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून आतापर्यंत तीन कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच कर्करुग्णांसाठी राज्यात २७ ठिकाणी डे-केअर उपचार केंद्रे उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कर्करोग उपचार योजनेचे पुनरावलोकन करून रेडिओथेरपी, केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि पीईटी स्कॅनसारख्या उपचारांचा अधिक व्यापक समावेश करण्याचे नियोजन शासनाने केले आहे.

‘महाराष्ट्र कर्करोग वॉरियर्स’ या उपक्रमातून तज्ज्ञ ऑन्कोलॉजिस्टच्या साहाय्याने निदान व उपचार सेवा उपलब्ध करून दिली जात असल्याचे सांगत कर्करोग निर्मूलनासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, खासगी रुग्णालये, तज्ज्ञ डॉक्टर आणि सेवाभावी संस्था यांनी समन्वयाने काम केल्यास राज्याचा कर्करोगमुक्तीचा संकल्प साध्य होऊ शकतो, असा विश्वास आबिटकर यांनी व्यक्त केला.

बैठकीत दक्षिण कोरियातील आयएमबी संस्थेकडून ‘लिक्विड बायोप्सी’ तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आले. सर्व प्रकारच्या कर्करोगाचे लवकर आणि अचूक निदान करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते, असे तज्ज्ञांनी नमूद केले. या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत पुढील मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी आरोग्य आयुक्त सुनील भोकरे आदी उपस्थित होते.