मुंबई : महाराष्ट्र राज्य काजू मंडळाला विभागीय कार्यालय, काजू प्रक्रिया प्रकल्प, गोदाम, सेंटर ऑफ एक्सलन्स युनिट आणि काजू करिता विशेष बाजार उभारणीसाठी चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील ४० एकराचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा भूखड विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यात मे २०२३ मध्ये काजू मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. पण, आजवर मंडळाला स्वतःचे कार्यालय नव्हते. काजू मंडळासाठीच्या सर्व पायाभूत सोयी – सुविधा एकाच जागी उभारण्यासाठी काजू मंडळाने एमआयडीसीकडे ४० एकर जागा विनामूल्य मागितली होती. एमआयडीसीने नियमीत २५ लाख रुपये एकर या दराऐवजी जिरायत दराने म्हणजे तीन लाख एकर दराने काजू मंडळाला जागा उपलब्ध करून दिली आहे.
हलकर्णी येथे काजू मंडळाचे विभागीय कार्यालय उभे राहील. अत्याधुनिक नर्सरी, काजूचे सेंटर ऑफ एक्सलन्स, काजू निर्यात केंद्र, अद्यायावत गोदाम आणि भारतातीलप पहिली काजू बाजार समिती, हे सर्व एकाच ठिकाणी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
निर्णय काजू उद्योगासाठी महत्त्वपूर्ण
चंदगड महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. चंदगडमध्ये घरोघरी काजू विक्रीचा व्यवसाय केला जातो. या ४० एकरावर काजू उद्योगासाठीच्या सर्व पायाभूत सुविधा उभारल्या जातील. मॅग्नेटमध्ये काजूचा समावेश करण्यात आला असून, मॅग्नेटच्या माध्यमातून काजूसाठी अद्यायावत गोदाम उभारले जाणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय काजू उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे तज्ज्ञ संचालक डॉ. परशराम पाटील यांनी दिली.
