मुंबई : विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजन करणे शक्य व्हावे यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येणाऱ्या विविध पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक परीक्षांचे तात्पुरते प्रवेशपत्र त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. सीईटी २४ मार्च ते १६ मे २०२६ या कालावधीत विविध परीक्षा घेण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्र कोणत्या शहरामध्ये असणार याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना या प्रवेशपत्रात दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करणे सोपे जावे यासाठी काही दिवसांपूर्वी सीईटी कक्षाने परीक्षांचे अंतिम वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले होते. त्यानुसार २४ मार्च ते १६ मे या कालावधीत विविध परीक्षा घेण्यात येणार आहेत. परीक्षेच्या वेळी काही जिल्हे किंवा शहरांमध्ये पुरेसे परीक्षा केंद्र नसल्याने किंवा विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यास विद्यार्थ्यांना अन्य जिल्ह्यातील किंवा शहरामध्ये परीक्षा केंद्र दिले जाते. ऐनवेळी विद्यार्थ्याला परीक्षा केंद्र कोणत्या शहरात आहे, हे समजल्यास त्याची धावपळ होण्याची शक्यता असते.
विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये व त्याला परीक्षेचे नियोजन करणे सोपे व्हावे यासाठी सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये तात्पुरते प्रवेशपत्र (परीक्षा शहर सूचना स्लिप) उपलब्ध केले आहे. यामध्ये फक्त परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असेल याची माहिती दिली जाणार असून, परीक्षा केंद्र कोणते आहे याबाबत कोणताही उल्लेख या तात्पुरत्या प्रवेशपत्रामध्ये असणार नाही. त्यामुळे तात्पुरते प्रवेशपत्र हे फक्त प्राथमिक दस्तऐवज असेल, असे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षेच्या चार दिवस आधी मिळणार प्रवेशपत्र
सीईटीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित सीईटी परीक्षेपूर्वी अंदाजे तीन ते चार दिवस आधी लॉग-इनमध्ये अंतिम प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. परीक्षेच्या चार दिवसांपूर्वी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अंतिम प्रवेशपत्रामध्ये जिल्हा आणि तालुका यासह परीक्षा केंद्र, परीक्षेची वेळ व अन्य सूचनांची तपशीलवार माहिती असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अंतिम प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यापूर्वी त्यावरील सर्व तपशील व्यवस्थित तपासावा. त्यानंतरच अंतिम प्रवेशपत्र डाउनलोड करावे, असे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच प्रवेश परीक्षेसंबंधी अद्ययावत माहिती आणि पुढील सूचनांसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला नियमितपणे भेट द्यावी, असा सल्ला सीईटी कक्षाकडून देण्यात आला आहे.
