मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांतील प्रश्न व उत्तरांवर आक्षेप नोंदवण्यासाठी ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मार्च आणि एप्रिल २०२६मध्ये झालेल्या सीईटी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एमसीए, एम.एचएमसीटी, एमपीएड, एमएड, ३ वर्षीय एलएलबी, बीपीएड, बीएड-एमएड आणि बीएड या अभ्यासक्रमांच्या परीक्षांनंतर उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिका, दिलेली उत्तरे आणि अधिकृत ‘उत्तर की’ पाहण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानुसार, उमेदवारांना प्रश्नांवर आक्षेप नोंदवण्यासाठी मर्यादित कालावधी देण्यात आला आहे.

एम.एचएमसीटी आणि एमसीए परीक्षांसाठी ३० एप्रिल ते २ मे २०२६, एमपीएड, एमएड, ३ वर्षीय एलएलबी, बीपीएड आणि बीएड-एमएडसाठी १ मे ते ३ मे २०२६, तर बीएडसाठी ३ मे ते ५ मे २०२६ या कालावधीत आक्षेप नोंदवता येणार आहेत.

उमेदवारांनी प्रत्येक आक्षेपासाठी स्वतंत्र शुल्क ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरावे लागणार असून केवळ लॉगिनमधूनच आक्षेप स्वीकारले जाणार आहेत. ई-मेल किंवा अन्य माध्यमांतून पाठवलेल्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.

निर्धारित मुदतीनंतर ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ बंद होणार असल्याने उमेदवारांनी वेळेतच आक्षेप नोंदवावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.