मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षातर्फे पाच वर्षीय विधि अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या यादीत १५ हजार ९१३ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार १३५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली. राज्यातील १६२ विधी महाविद्यालयांमधील १० हजार ७७१ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली.
यंदा विधि प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयांच्या नोंदणीचा घोळ झाल्याने सुरुवातीपासूनच प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. महाविद्यालये आणि उपलब्ध जागांची माहिती अंतिम टप्प्यात स्पष्ट झाल्याने विद्यार्थ्यांच्या पसंतीक्रमावरही त्याचा परिणाम झाला. अखेर १६२ महाविद्यालयांतील उपलब्ध जागांचा विचार करून पहिली यादी जाहीर करण्यात आली. पाच वर्षीय विधि अभ्यासक्रमासाठी एकूण १८ हजार ४९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत १५ हजार ९१३ विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले. त्यामुळे पहिल्या फेरीसाठी याच विद्यार्थ्यांचा विचार करण्यात आला. पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २१ ऑगस्टदरम्यान संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. शुल्क भरल्यानंतरच प्रवेश निश्चित होणार आहे.
स्थापत्यशास्त्र अभ्यासक्रमाची दुसरी यादी जाहीर
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी. आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची दुसरी यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या फेरीत २ हजार ७ विद्यार्थ्यांनी पसंती नोंदवली असून त्यापैकी ७२८ नवीन विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे, तर ८९३ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पहिल्या तीन पसंतींपैकी एका महाविद्यालयात जागा मिळाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित म्हणजे ‘ऑटो फ्रीझ’ झाले आहेत. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असेल. प्रवेश नाकारल्यास त्यांना तिसऱ्या किंवा चौथ्या फेरीत सहभागी होता येणार नसून थेट संस्थात्मक फेरीत प्रवेशाची संधी मिळेल.
पहिल्या फेरीत जागावाटप झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ हजार १८३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला. तर ९७० विद्यार्थ्यांनी ‘बेटरमेंट’चा पर्याय निवडला आहे. दुसऱ्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी १८ ते २० ऑगस्टदरम्यान संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक कागदपत्रे सादर करून शुल्क भरावे आणि प्रवेश निश्चित करावा.
