मुंबई : विधि (३ वर्ष), बीएड – एमएड (३ वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) व बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन (बीपीएड) या अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेची (सीईटी) प्रवेश नोंदणी ३ मार्च २०२६ रोजी संपली. या अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना काही चुका झाल्या असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ९ ते ११ मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांना दुरुस्तीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

विधि (३ वर्ष) या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश नोंदणी ८ ते २३ जानेवारी २०२६ पर्यंत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर १३ फेब्रुवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली. बीएड-एमएड या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी ९ ते २४ जानेवारीदरम्यान नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर १४ फेब्रुवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली. बीपीएडची नोंदणी १६ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत होती. यानंतर १७ फेब्रुवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली. यानंतर या तिन्ही अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश नोंदणीला२८ फेब्रुवारीपर्यंत दुसरी आणि ३ मार्चपर्यंत तिसरी व अंतिम मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत विधि (३ वर्ष) अभ्यासक्रमासाठी ८२ हजार ८८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बीएड-एमएड (३ वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) यासाठी १ हजार २२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. बीपीएड अभ्यासक्रमासाठी ६ हजार १५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

नोंदणी प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे. अशा विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना अनावधानाने काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्तीसाठीची सीईटी कक्षाकडून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ९ ते ११ मार्चदरम्यान दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगीनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करावयाची आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जात विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, स्वाक्षरी व लिंग यामध्ये दुरुस्ती व बदल करता येणार आहे.

विधि (३ वर्ष) या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा १ व २ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच बीएड-एमएडची (३ वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) परीक्षा ९ एप्रिल आणि बीपीएडची प्रवेश परीक्षा ४ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. तर याची फिल्ड परीक्षा (ऑफलाईन) ५ ते ७ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.

२०२५ च्या विधि (३ वर्ष) प्रवेश परीक्षेसाठी ९४ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बीएड-एमएड (३ वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) या प्रवेश परीक्षेसाठी १ हजार १३९ आणि बीपीएडच्या परीक्षेसाठी ६ हजार ५९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

बी. डिझाईन सीईटी अर्ज ९ ते ११ मार्चपर्यंत करता येणार दुरुस्ती

बी. डिझाईन अभ्यासक्रमाची सीईटी प्रवेश नोंदणी २७ फेब्रुवारी रोजी संपली. या अभ्यासक्रमासाठी १७१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्यासाठी ९ ते ११ मार्चदरम्यान ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगीनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करावयाची आहे. बी. डिझाईन अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश नोंदणी दिनांक २२ जानेवारीपासून सुरुवात झाली. बी. डिझाईन या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ५ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.