मुंबई : राज्यातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने बीबीए, बीएमएस, बीबीएम, एमबीए (इंटिग्रेटेड), बीसीए, एमसीए (इंटिग्रेटेड) तसेच बॅचलर ऑफ फाईन आर्ट (बीएफए) या अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए आणि संबंधित अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना १६ जुलैपर्यंत ऑनलाइन प्रवेश नोंदणी करता येणार आहे, तसेच बीएफए अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणी १४ जुलै रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येणार आहे.

बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए, एमबीए (इंटिग्रेटेड) आणि एमसीए (इंटिग्रेटेड) अभ्यासक्रमांसाठी कागदपत्र पडताळणी व अर्ज निश्चिती प्रक्रिया ७ ते १७ जुलैदरम्यान पार पडणार आहे. या अभ्यासक्रमांची तात्पुरती गुणवत्ता यादी १९ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना २० ते २२ जुलैदरम्यान हरकती नोंदविण्याची संधी देण्यात येणार असून अंतिम गुणवत्ता यादी २४ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. बीएफए अभ्यासक्रमासाठी अर्ज पडताळणी आणि निश्चिती प्रक्रिया ८ ते १५ जुलैदरम्यान होणार असून तात्पुरती गुणवत्ता यादी १७ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावरील हरकतींसाठी १८ ते २० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अंतिम गुणवत्ता यादी २१ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.

गतवर्षी बीबीए, बीएमएस, बीबीएम, एमबीए (इंटिग्रेटेड), बीसीए, एमसीए (इंटिग्रेटेड) आणि बीएफए या अभ्यासक्रमांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. बीबीए अभ्यासक्रमासाठी राज्यातील ३९० संस्थांमध्ये ५६ हजार ६७८ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी केवळ १९ हजार ८४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर ३६ हजार ८३५ जागा रिक्त राहिल्या. बीसीए-एमसीए (इंटिग्रेटेड) अभ्यासक्रमासाठी ४१६ संस्थांमध्ये ४८ हजार ८१७ जागा उपलब्ध असताना केवळ १७ हजार १५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला, तर ३१ हजार ८०२ जागा रिक्त राहिल्या. बीएफए अभ्यासक्रमाच्या १२ संस्थांमधील ८३८ जागांपैकी ६३८ जागांवर प्रवेश झाले, तर २०० जागा रिक्त राहिल्या होत्या.

यंदा पीसीएम आणि पीसीबी गटाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि बीसीए अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना देखील संबंधित अभ्यासक्रमांसाठी अर्ज करता येणार आहे. सीईटी सेलने यंदा कागदपत्रे पडताळणीसाठी ‘ई-स्क्रूटिनी’ किंवा ‘प्रत्यक्ष पडताळणी’ असे दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

ई-स्क्रूटिनीची निवड केल्यास उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी संबंधित केंद्राकडून ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. मात्र, प्रत्यक्ष पडताळणीचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष केंद्रांवर जाऊन मूळ कागदपत्रांसह पडताळणी करून घेणे बंधनकारक राहणार आहे.

बीएफए अभ्यासक्रमासाठी प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी अनिवार्य केली आहे. विद्यार्थ्यांनी अर्जाची पडताळणी आणि निश्चिती करून घेतली नाही, तर त्यांचे अर्ज रद्द केले जातील आणि त्यांची नावे गुणवत्ता यादीत समाविष्ट केली जाणार नाहीत. राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना अर्ज आणि कागदपत्रांच्या प्रती स्पीड पोस्ट, कुरिअर किंवा प्रत्यक्ष सीईटी कक्षात सादर कराव्या लागणार आहेत.

असे आहे वेळापत्रक

बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए ऑनलाइन नोंदणी : ६ ते १६ जुलै (सायं. ५ वाजेपर्यंत) कागदपत्र पडताळणी व अर्ज निश्चिती : ७ ते १७ जुलै (सायं. ५ वाजेपर्यंत) तात्पुरती गुणवत्ता यादी : १९ जुलै

हरकती नोंदविणे : २० ते २२ जुलै

अंतिम गुणवत्ता यादी : २४ जुलै

बीएफए

ऑनलाइन नोंदणी : ७ ते १४ जुलै (रात्री ११.५९ पर्यंत) कागदपत्र पडताळणी व अर्ज निश्चिती : ८ ते १५ जुलै (सायं. ५.३० पर्यंत) तात्पुरती गुणवत्ता यादी : १७ जुलै

हरकती नोंदविणे : १८ ते २० जुलै (सायं. ५ पर्यंत) अंतिम गुणवत्ता यादी : २१ जुलै