मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबविण्यात येत असलेल्या बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची तिसरी फेरी नुकतीच पार पडली. या फेरीनंतर जवळपास ५ हजार ५७३ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये खासगी महाविद्यालयांमध्ये ५ हजार ५६७, तर सरकारी महाविद्यालयांमध्ये अवघ्या ६ जागा रिक्त राहिल्या आहेत.

भारतीय परिचारिका परिषदेच्या (आयएनसी) सूचनेनुसार बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमांच्या महाराष्ट्रात १६ हजार ५३० जागा आहेत. या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी राज्यभरातून ४७ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४३ हजार १९१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.

नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ३१ ऑक्टोबर रोजी पार पडली. त्यानंतर अनेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्याने या संस्थांनी परिषद आणि सीईटी कक्षाकडे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन विशेष संस्थात्मक प्रवेश फेरी राबविण्याचा निर्णय परिषदेने घेतला. त्यानुसार २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची विशेष फेरी राबविण्यात आली. मात्र या फेरीनंतरही बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या तब्बल ५ हजार ५७३ जागा रिक्त राहिल्या आहेत.

राज्यात यंदा शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची १७ महाविद्यालये आणि २७७ खासगी महाविद्यालये अशी २९४ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये १६ हजार ५३० जागा आहेत. १७ सरकारी महाविद्यालयांमधील १ हजार १८० जागांपैकी १ हजार १७४ जागांवर प्रवेश झाले असून, फक्त ६ जागा रिक्त आहेत. तसेच २७७ खासगी महाविद्यालयांमध्ये १५ हजार ३५० जागा होत्या. यापैकी ९ हजार ७८३ जागांवर प्रवेश झाले. त्यामुळे खासगी महाविद्यालयांमधील ५ हजार ५६७ जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यभरामध्ये ५ हजार ५७३ रिक्त जागा रिक्त राहिल्या असून, या जागांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.