मुंबई : नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) अभियांत्रिकीच्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीवरून गोंधळ उडाला आहे. यामध्ये गतवर्षी सीईटीमध्ये ९९ ते १०० पर्सेंटाईल गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत अत्यंत कमी गुण असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केला जात आहे. त्यामुळे सीईटी सेलच्या विश्वासार्हतेवर पालकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मात्र समाजमाध्यमांवरून सर्वदूर होणारी तात्पुरती गुणवत्ता यादी चुकीची असून, तिचा सीईटी कक्षाच्या यादीशी काही संबंध नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.

सीईटीच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह

काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यासह काही व्यक्तींनी ‘एक्स’वर पोस्टद्वारे एक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. या कथित गुणवत्ता यादीमध्ये काही विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये १०० पर्सेंटाईल किंवा त्याच्या जवळपास गुण मिळाले आहेत. पण यादीनुसार त्याच विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेतील गुण तुलनेने खूपच कमी असल्याचा दावा करण्यात आला. काही विद्यार्थ्यांना बारावीमध्ये अवघे ५० ते ६० टक्क्यांच्या आसपास गुण असताना सीईटीमध्ये अव्वल पर्सेंटाईल कसे मिळू शकतात, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

बारावीमध्ये सरासरी कामगिरी करणारे विद्यार्थी सीईटीमध्ये राज्यातील अव्वल विद्यार्थ्यांमध्ये कसे पोहोचले ? गुणवत्ता यादीत फेरफार केला आहे का ? माहितीमध्ये छेडछाड करण्यात आली आहे का ? अशा स्वरूपाचे प्रश्न समाजमाध्यमांवर विचारण्यात येत आहेत. या पोस्टमध्ये काही विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल, बारावीतील गुण आणि प्रवर्गाची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे, अनेकांनी ही अधिकृत गुणवत्ता यादीच असल्याचे गृहीत धरून प्रतिक्रिया दिल्या. काहींनी नीटप्रमाणेच सीईटी प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली; तर काहींनी ‘गुणवत्तेमध्ये गडबड आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित केला.

सीईटी कक्षाकडून तातडीने पडताळणी

या प्रकाराची दखल घेऊन सीईटी कक्षाने समाजमाध्यमावरी पोस्टची तातडीने पडताळणी केली असता ही यादी चुकीची असल्याचे लक्षात आले. सीईटीच्या मूळ तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांच्या अर्जाचा क्रमांक ‘ईएन’ने सुरू होतो, तर समाजमाध्यमावरून प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये ‘पीसीएम’ने सुरूवात करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचा प्रवर्ग, दहावी-बारावीचे गुण आणि सीईटी पर्सेंटाईल यामध्येही विसंगती असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित समाजमाध्यम पोस्टला कोणतीही मान्यता नसल्याचे सीईटी कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या यादीवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.