मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटी घेण्यास सुरुवात झाली असून काही अभ्यासक्रमांची अर्ज नोंदणी अखेरच्या टप्प्यात आहे. त्यानुसार परिचारिका अभ्यासक्रमांतर्गत येणाऱ्या बीएस्सी नर्सिंग, डिप्लोमा इन सायकॅट्रिक (डीपीएन) आणि पब्लिक हेल्थ नर्सिंग (पीएचएन) या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्यास ४ एप्रिलपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच २५ मार्च रोजी अर्ज नोंदणी प्रक्रिया संपलेल्या बी.एचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस या अभ्यासक्रमाला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी १ एप्रिलपर्यंत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बीएस्सी नर्सिंग, डीपीएन आणि पीएचएन या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत २५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. आतापर्यंत बी.एस्सी नर्सिंगसाठी ४६ हजार ४५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर डीपीएन व पीएचएनसाठी ३९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

या अभ्यासक्रमाला अधिकाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी व्हावी यासाठी सीईटी कक्षाने या अभ्यासक्रमाच्य अर्ज नोंदणीसाठी ३१ मार्चपाासून ४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही मुदतवाढ अंतिम असल्याने विद्यार्थ्यांनी तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे. डीपीएन व पीएचएनची प्रवेश परीक्षा ५ मे २०२६ रोजी आणि बीएस्सी नर्सिंगची प्रवेश परीक्षा ६ व ७ मे रोजी होणार आहे.

बीसीए, बीएमएस सीईटीच्या अर्जात १ एप्रिलपर्यंत करता येणार दुरुस्ती

बी.एचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएससाठीची प्रवेश नोंदणी प्रक्रिया २५ मार्च २०२६ रोजी संपली. राज्यभरातून या अभ्यासक्रमासाठी ७१ हजार ६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.

अशा विद्यार्थ्यांकडून अनवधानाने अर्ज भरताना काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्तीसाठीची १ एप्रिलपर्यंत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या लॉगीनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करावयाची आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही व लिंग यामध्ये दुरुस्ती व बदल करता येणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २८ ते ३० एप्रिल रोजी होणार आहे.

एमसीए सीईटीला ९५.८४ टक्के विद्यार्थी उपस्थित

मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) या अभ्यासक्रमाची सीईटी ३० मार्च रोजी सकाळ व दुपारच्या दोन सत्रात झाली. या परीक्षेला ५५ हजार ५६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दोन्ही सत्रात मिळून ५३ हजार २५६ म्हणजेच ९५.८४ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सकाळच्या सत्रात २७ हजार ७८२ विद्यार्थ्यांपैकी २६ हजार ५६७ विद्यार्थी उपस्थित होते. तर, १ हजार २१५ विद्यार्थी अनुपस्थित होते. दुपारच्या सत्रात २७ हजार ७८५ विद्यार्थ्यांपैकी २६ हजार ६८९ विद्यार्थी उपस्थित होते, तर १ हजार ९६ विद्यार्थी अनुपस्थित होते.