मुंबई : मास्टर ऑफ एज्युकेशन (एमएड) व मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एम. एचएमसीटी) या दोन अभ्यासक्रमाची २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील सीईटी प्रवेश परीक्षा २५ मार्च २०२६ रोजी होत आहे. राज्यात एमएडसाठीे ३ हजार ९८५, तर एम.एचएमसीटीसाठी ५५ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) दिली.
एमएड या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी ३ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये १ हजार २१६ पुरुष आणि २ हजार ७६९ महिलांचा समावेश आहे. या वर्षीच्या नोंदणीमध्ये १८ अनाथ विद्यार्थी व ३४ दिव्यांग विद्यार्थीही एमएडची प्रवेश परीक्षा देणार आहेत. मागील वर्षी एमएड सीईटीच्या प्रवेश परीक्षेमध्ये ३ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थी संख्या १७६ ने जास्त आहे. या अभ्यासक्रमांसाठीची ही सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने होणार आहे. ही सीईटी प्रवेश परीक्षा राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांतील ४६ परीक्षा केंद्रांवर होणार आहे.
एम.एचएमसीटी साठी ५५ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार
एम.एचएमसीटी या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी ५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये २९ पुरुष व २६ महिलांचा समावेश आहे. या वर्षीच्या नोंदणीमध्ये १ दिव्यांग विद्यार्थी एम.एचएमसीटीची प्रवेश परीक्षा देणार आहे. मागील वर्षी एम.एचएमसीटी सीईटीच्या प्रवेश परीक्षेसाठी ८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ही सीईटी प्रवेश परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या ४ परीक्षा केंद्रांवर होणार आहे.
एमपीएड सीईटी परीक्षेला ८४.८७ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
एमपीएड या अभ्यासक्रमाच्या परीक्षेने २४ मार्च २०२६ रोजी सीईटी प्रवेश परीक्षेला सुरुवात झाली. या परीक्षेला २ हजार ५२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार १४३ विद्यार्थ्यांनी ही प्रवेश परीक्षा दिली. त्यानुसार या प्रवेश परीक्षेला ८४.८७ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. एकूण ३८२ विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित होते.
ही सीईटी प्रवेश परीक्षा सकाळच्या सत्रात (सकाळी ११ ते दुपारी १२) झाली. राज्यातील अमरावती येथील ३, छत्रपती संभाजी नगर २, जळगाव १, मुंबई ३ , नागपूर ४, पुणे ४ व सोलापूरमधील १ अशा एकूण १८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या सीईटी परीक्षेमध्ये राज्यातून कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही.
