मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) ५ जानेवारीपासून १७ विविध पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली असून आतापर्यंत या १७ प्रवेश परीक्षांसाठी राज्यभरातून ६ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली. यामध्ये उच्च शिक्षण व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र तंत्रशिक्षण विभागांतर्गत एमएचटी सीईटी परीक्षा वगळता एमसीए, एमबीए, बीबीए, बीएमएस या अभ्यासक्रमांना अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी यासाठी सीईटी कक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत.

गतवर्षी झालेल्या प्रवेश परीक्षांना राज्यभरातून १४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी त्यापेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, यासाठी सीईटी कक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्रवेश नोंदणीला यंदा ५ जानेवारीपासून एमपीएड व एमएड या दोन अभ्यासक्रमाच्या नोंदणीपासून सुरूवात करण्यात आली. त्यानुसार आजपर्यंत ६ लाख ३६ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या एमएचटी सीईटी अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक ३ लाख ९० हजार ७१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मात्र त्याव्यतिरिक्त अन्य अभ्यासक्रमांच्या नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

एमसीए अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत १९ हजार ९५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून गतवर्षी या अभ्याक्रमासाठी ३९ हजार ९६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तसेच यंदा परीक्षेची दोन वेळा संधी देण्यात आलेल्या एमबीए/एमएमएस या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत ५८ हजार ६९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर गतवर्षी १ लाख ५२ हजार ९११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्याचप्रमाणे यंदा एकत्रित करण्यात आलेल्या बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम आणि बी.एचएमसीटी या परीक्षांसाठी यंदा १७ हजार ५०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर गतवर्षी या अभ्यासक्रमासाठी ५८ हजार २४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

एम.एचएमसीटीसाठी आतापर्यंत ३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गतवर्षी १७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यावरून तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांना अद्यापपर्यंत फारशी नोंदणी झाल्याचे दिसून येत नाही. सीईटी कक्षाने जाहीर केलेल्या अंदाजित वेळापत्रकानुसार मार्चच्या अखेरीस परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यासाठी फेब्रुवारीमध्ये नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये तंत्रशिक्षण विभागातील या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी वाढविण्याची मोठी जबाबदारी सीईटी कक्षावर असणार आहे.

आजपर्यंत पीसीएम सीईटीसाठी सर्वाधिक २ लाख ५५ हजार ८२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर पीसीबी सीईटीसाठी १ लाख ३४ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याखालोखाल बीएड अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी

७५ हजार ७६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर विधि तीन वर्षांसाठी ५० हजार ५४० विद्यार्थी, विधि पाच वर्षांसाठी २१ हजार ७१२ विद्यार्थी, परिचारिका अभ्यासक्रमासाठी १० हजार २०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सीईटी कक्षामार्फत पदवी अभ्यासक्रमाच्या १२ प्रवेश परीक्षा तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ५ प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.