मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेची चाचणीला अखेर आज (बुधवार) १ मे रोजी महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवला. पहिल्या टप्प्यात वर्सोवा ते आझाद नगर मेट्रो रेल्वे स्थानक या तीन किलोमीटरच्या मार्गावर ही चाचणी घेण्यात आली. दरम्यान, वर्सोवा ते सप्टेंबर हा मार्ग सप्टेंबर आणि वर्सोवा ते घाटकोपर हा मार्ग १३ डिसेंबरपर्यंत सुरू होणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त यूपीएस मदान आणि इतर वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर अशा ११.७ किलोमीटरच्या मार्गावर मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेचे बांधकाम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. मे २०१३ पर्यंत बांधकाम पूर्ण होऊन चाचण्या सुरू होतील व नोव्हेंबर-डिसेंबर २०१३ मध्ये मेट्रो रेल्वे सुरू होईल, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केला होता. ही पहिली मेट्रो रेल्वे ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या अखत्यारीतील ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’ या कंपनीतर्फे उभारण्यात येत आहे.
वर्सोवा ते घाटकोपर हे अंतर मेट्रो रेल्वेमुळे अवघ्या २१ मिनिटांत आणि तेही वातानुकूलित डब्यांमधून कापता येईल. या प्रवासासाठी सध्या रस्ता पूर्ण मोकळा असला तरी सुमारे पाऊण तास लागतो.