मुंबई : राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व आशा कोरके यांना सोमवारी अटक केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल अनेक गुन्ह्यंचा तपास सीआयडी करत आहे. त्यातील मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात श्याम सुंदर अग्रवाल यानी दाखल केलेल्या गुन्ह्यात सीआयडीने ही अटक केली आहे. त्या दोघांनाही मंगळवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.

या प्रकरणात परमबीर हे मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. कुख्यात गुंड छोटा शकील मार्फत पुनामियाला धमकी दिल्याच्या आरोपाखाली भाईंदर येथील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांना ‘मोक्का’अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्याची धमकी परमबीर यांनी दिली होती. तसेच पुतण्याची खोटी स्वाक्षरी घेऊन खोटे दस्तावेज बनवून अग्रवाल यांची कोटय़ावधी रुपयांची मालमत्ता खंडणी म्हणून घेतली. याच प्रकरणात नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांनी ५० लाखांची खंडणी मागितली. अग्रवाल यांनी उसने पैसे घेऊन कोरके यांना ५०लाख दिले. याप्रकरणी कोरके व गोपाळे दोघांनाही चौकशीसाठी सीआयडीने बोलवले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ही याप्रकरणातील चौथी अटक आहे. यापूर्वी याप्रकरणी संजय पुनामिया व सुनील जैन यांना याप्रकरणी अटक झाली होती.