मुंबई : राज्यात हस्ताक्षर तज्ज्ञांच्या गेल्या सात ते आठ वर्षांपासून रिक्त असलेल्या १६ पदांसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत पात्रता अटींचे उल्लंघन झाल्याची बाब राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने मान्य केली आहे. आता याबाबत सुधारीत जाहिरात प्रसिद्ध करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या पदांसाठी हुकलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करता येणार आहेत. याबाबत परीक्षेसाठी महिनाभराचा कालावधी दिला जाणार आहे.
देशात हस्ताक्षर तज्ज्ञ विभाग हा न्यायवैद्यक विभागाच्या अखत्यारीत येतो. मात्र राज्यात आजही हा विभाग गुन्हे अन्वेषण विभागाच्या अखत्यारीत आहे. या विभागातील सहायक दस्तऐवज परीक्षकांची (हस्ताक्षर तज्ज्ञ) शेवटची भरती २०१८ मध्ये झाली होती. राज्यात हस्ताक्षर तज्ज्ञांची ४० पदे असून त्यापैकी १६ पदे रिक्त आहेत. या पदांसाठी वारंवार मागणी करुनही भरती करण्यात आलेली नव्हती. अखेरीस उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर राज्य शासनाने १६ रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. मात्र सरळसेवा पद्धतीने भरती करताना सामान्य प्रशासन विभागाने २०२२ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केले. सरळसेवेने पदे भरताना परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित करून, त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी असे विषय निश्चित करणे आणि या विषयांवरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ५० गुण अशी २०० गुणांची परीक्षा घेणे आवश्यक आहे. मात्र सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक पदाच्या सरळसेवा भरती जाहिरातीत त्याचा उल्लेख दिसून येत नव्हता. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सुधारीत जाहिरात प्रसिद्ध करण्याचे ठरविले आहे.
सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक पदाच्या तांत्रिक बाबी, शैक्षणिक अर्हंता, कर्तव्य व जबाबदाऱ्या लक्षात घेता सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार शारीरिक चाचणी किंवा व्यावसायिक चाचणीला पर्याय म्हणून निरीक्षण चाचणी घेण्याचे ठरविण्यात आले. अशा वेळी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ३० गुण अशी १२० गुणांची (६० प्रश्न) परीक्षा व ८० गुणांची शारीरिक चाचणी/ व्यावसायिक चाचणी/ निरीक्षण चाचणी घेणे अभिप्रेत होते. प्रामुख्याने रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र या विषयातील पदवीधरांना संधी मिळते. मात्र सहायक शासकीय दस्तऐवज पदाच्या परीक्षा पद्धतीत याबाबत उल्लेख टाळण्यात आला व सरसकट सर्वांना निरीक्षण चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले. आता मात्र रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र या विषयातील पदवीधरांना प्राधान्यक्रम दिला जाणार आहे.
हस्ताक्षर तज्ज्ञ भरतीसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी आपण रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयातील प्राध्यापकांची बैठक बोलाविली आहे. याबाबत आम्ही सुधारीत जाहिरात लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. त्यानंतर उमेदवारांना परीक्षेसाठी महिन्याभराचा कालावधी दिला जाईल – सुनील रामानंद, अतिरिक्त पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग
