मुंबई : राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तीन विविध पथकांकडून तीन फेऱ्यांमध्ये चौकशी करणार आहे. पुढील आठवडय़ात ही चौकशी करण्यात येणार असून अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली चौकशी होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना ६ डिसेंबपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाल्यानंतर सिंह यांनी बुधवारी आपण चंदीगडमध्येच असल्याचे सांगितले. तसेच लवकरच मुंबईत तपास यंत्रणांपुढे हजर होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अज्ञातवासात असलेले सिंह सुमारे २३१ दिवसांनंतर गुरुवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. गुन्हे शाखा व ठाणे पोलिसांनी परमबीर यांची चौकशी केल्यानंतर आता सीआयडी तीन गुन्ह्य़ांमध्ये सिंह यांची चौकशी करणार आहे. तीन विविध तपास अधिकाऱ्यांचे पथक ही चौकशी करणार असून त्यासाठी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. या तीन गुन्ह्य़ांसाठी तीन भिन्न प्रश्नावल्या बनवण्यात आल्या आहेत. सीआयडीचे अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही चौकशी करण्यात येणार आहे. सीआयडी परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल दोन खंडणीच्या गुन्ह्य़ांसह तीन गुन्ह्य़ांचा तपास करत आहे. तिसरा गुन्हा हा अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यासह इतर कलमांतर्गत दाखल आहे.