मुंबई : भारताला आमनेसामने लढाईत पराभूत करणे शक्य नसल्याने देशाला आतून कमकुवत करण्याकरिता तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकविण्याचे छुपे षडयंत्र रचले जात आहे. दुर्दैवाने, पैशाच्या मोहापोटी देशातील काही घटकही या कारवायांमध्ये सहभागी होत आहेत. त्यांचा वापर करून हे षडयंत्र अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी मुंबई येथे अंमली पदार्थ मुक्त मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश असून ही तरुणाईच विकसित भारताची सर्वात मोठी ताकद आहे. ही युवा पिढी उद्याचा भारत घडविणार असून, त्यांना योग्य दिशा मिळाल्यास भारत जगाचा मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अंमली पदार्थाच्या विरोधात ही लढाई केवळ पोलीस प्रशासनाची नाही. आरोग्य, सामाजिक न्याय, शालेय शिक्षण विभाग, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाजातील प्रत्येक घटकाला याविरोधात सामूहिक युद्ध सुरू करावे लागेल. अंमली पदार्थांचा पुरवठा, उत्पादन आणि तस्करीविरोधात सरकारकडून कठोर कारवाई केली जात असली तरी समाजाच्या सक्रिय सहभागाशिवाय हे अभियान यशस्वी होणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याच्या माध्यमातून अंमली पदार्थाच्या माफियांचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करावे लागणार आहे. यासाठी अंमली पदार्थ विक्री, पुरवठा किंवा व्यसनाधीनतेबाबतची माहिती तात्काळ प्रशासनापर्यंत पोहोचवावी, ही माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. भविष्यात त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
पंतप्रधानांकडून अभियानाचे कौतुक
राज्य शासनाने सुरु केलेले ‘अंमली पदार्थ मुक्त अभियान’ हे नशामुक्त, जागरुक, आणि सशक्त समाज निर्मितीसाठी महत्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या संदेशात केले आहे. हे अभियान सुरु केल्याबद्दल पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्य़ांचे अभिनंदन केले. नशा ही समाजाच्या आरोग्य, सुरक्षितता, शांतता आणि विकासासमोरील गंभीर समस्या आहेत. व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर, आत्मविश्वासावर आणि जीवनाच्या दिशेवर या नशेमुळे प्रतिकूल परिणाम होतो. मादक पदार्थांचे व्यसन हे विशेषतः तरुणांच्या भविष्याला, त्यांच्या प्रतिभेला, त्यांच्या संधींना मोठा धोका निर्माण करणारे आहे. नशामुक्त समाजाच्या उभारणीसाठी जनजागृतीबरोबरच कुटुंबातील संस्कार, समाजाची सामूहिक जबाबदारी आणि विविध संस्थांचे प्रयत्न आवश्यक आहेत, असे पंतप्रधानांनी पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे.
