मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्या नव्या अधिकृत गाडीवर लावलेल्या लाल आणि निळ्या दिव्यांमुळे सध्या सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली. केंद्र सरकारने २०१७ मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, नामफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास बंदी घातली होती. त्यानंतर आता रितू तावडे यांच्या गाडीला लावलेले लाल-निळे दिवे पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

मुंबईच्या महापौर रितू तावडेंना उगाच टार्गेट केलं जातं आहे-फडणवीस

रितू तावडे यांच्या गाडीच्या लाल दिव्याबाबत जी चर्चा होते आहे त्याची मी माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर नव्हता. बोनेटच्या ठिकाणी लाल दिवा होता. त्यात महापौरांचा दोष नाही. राज्यात कुणीही लाल दिवे वापरु नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे. महापौरांना त्याची कल्पना आहे. मला वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट केलं जातं आहे. त्यांना टार्गेट करणं योग्य नाही. असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

रितू तावडे यांच्या कारवरच्या लाल दिव्याचं प्रकरण काय?

मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांच्या नव्या कोऱ्या गाडीवर असलेल्या लाल व निळ्या दिव्यांमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. केंद्र सरकारने सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातलेली असली तरी भाजपची सत्ता मुंबई महापालिकेवर येताच या नियमाला बगल देण्यात आली आहे. वाहनाच्या वर नाही तर पुढच्या बाजूस असे निळे व लाल दिवे बसवण्यात आले आहेत. तसेच दिमतीलाही पोलिसांच्या वाहनासरखी लाल-निळ्या दिव्यांची स्कॉर्पिओ गाडीही त्यांच्या ताफ्यात दिसून येते.

भाजपाने व्हीआयपी संस्कृती आणल्याची चर्चा

मुंबई महापालिकेवरील ठाकरेंच्या शिवसेनेची २५ – ३० वर्षांपासूनची सत्ता घालवून भाजपने आपली सत्ता आणली आहे. मात्र सत्ता हाती आल्यानंतर महापालिकेत भाजपनेही व्हीआयपी संस्कृती आणली असल्याची चर्चा आहे. महापौरांच्या वाहनावरील लाल व निळे दिवे सध्या समाजमाध्यमांवर चर्चेत आहेत. केंद्र सरकारने मे २०१७ मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, नावफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास बंदी घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने व्हीआयपी संस्कृती संपवल्यामुळे त्यावेळी या निर्णयाचे कौतुक झाले होते. मात्र आता भाजपच्या सत्तेतील पदाधिकारीच या नियमाला बगल देत असल्याची चर्चा आहे. महापौरांच्या वाहनावर समोरच्या भागावर लाल आणि निळे दिवे आणि ध्वज, नामफलक हे सारे आहे. त्यामुळे नियम मोडल्याची चर्चा सुरू आहे. आता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.