मुंबई : दक्षिण मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथील विल्सन जिमखाना जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला देण्यात आला असून ज्या उद्देशासाठी जिमखाना दिला, तो साध्य झाला नाही, तर हा भूखंड जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या ताब्यातून काढून घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये मुख्यमंत्री बोलत होते. मरिन ड्राईव्ह येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या पाचपैकी एक विल्सन जिमखान्याचा भूखंड जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला भाडेपट्ट्याने देण्यात आला असून या जिमखान्याचे ‘जैन जिमखाना’ असे नामकरण करण्यात आले आहे.

हे मैदान जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला देण्यास स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केला आहे. मात्र रहिवाशांचा विरोध डावलून हा जिमखाना जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला देण्यात आला. जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने या भूखंडाचा ताबा घेऊन दर्शनीभागात ‘जैन जिमखाना’ असा नामफलक झळकवला आहे. याबाबतचे वृत्त मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले.

यासंदर्भात विचारणा केली असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विल्सन जिमखान्याचा करार संपुष्टात आला होता. जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा जिमखान्याबाबतचा प्रस्ताव आपल्याकडे आला होता. त्यावेळी करार झालेल्या संस्थेकडून जिमखान्याचा वापर दिलेल्या उद्देशासाठी होत नव्हता. त्यामुळे जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा प्रस्ताव आल्यानंतर त्याची पडताळणी करून जिमखाना संस्थेला देण्यात आला. तथापि, ज्या उद्देशासाठी हा जिमखाना देण्यात आला, त्यासाठीच त्याचा वापर व्हायला हवा. मूळ उद्देश साध्य झाला नाही, तर जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या ताब्यातूनही हा भूखंड काढून घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.