मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी उसळत असलेल्या हिंसाचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट करत दोषींवर कठोर कारवाईचे आदेश गृह विभागास दिले आहेत. तसेच राज्यातील वातावरण शांत राखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यात दंगली होणार ही सातत्याने विरोधकांकडून होणारी विधाने आणि त्याला लगेच एका विशिष्ट समुदायाकडून दिला जाणारा प्रतिसाद, त्यातून जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरणाच्या घडणाऱ्या घटना या संबंधाची चौकशी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कायदा हातात घेणाऱ्यांची गय करू नका, हिंसाचाराच्या घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी असली तरी लोकांनीही त्यासाठी सहकार्य करावे. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले.




कोल्हापूरमध्ये विरोधी पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणतात, दंगल घडविण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे उदात्तीकरणाच्या घटना घडतात. त्यामुळे या विधानाचा आणि या घटनांचा काही संबंध आहे का, अचानक कोण पुढे आले आणि त्यांना कोणाची फूस आहे का, याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री फडणवीस यांनी दिली. विरोधकांच्या दंगलीच्या वक्तव्यांनंतर अनेक जिल्ह्यांत औरंगजेबाचे उदात्तीकरण हा काही साधा योगायोग नाही. याच्या खोलात आम्ही जाऊ. लोकांचे एका सुरात बोलणे आणि त्याला लगेच एका विशिष्ट समाजातून त्यांना प्रतिसाद देत औरंगजेबाचे उदात्तीकरण, हा योगायोग असूच शकत नाही. औरंगजेब कुणाला जवळचा वाटतो, हे आपल्या सर्वाना ठावूक आहेच असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.