राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असलेले सरकार, अशा अस्थिर सरकारपेक्षा मध्यावधी निवडणूक घ्या, अशी मागणी ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात केली होती. तसेच मुंबईतील विजेच्या दिव्यांवर करण्यात आलेल्या रोषणाईला डान्सबारची उपमा दिली होती. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह वाटय़ाला आले असले तरी एकाला पेलले नाही, माहीम आणि सांगलीतील अल्पसंख्याक समजाच्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई करावी तसेच मशिदींवरील भोंगे काढावेत, अशा मागण्याही ठाकरे यांनी केल्या होत्या. उद्धव ठाकरे यांना विरोध हा समान धागा भाजप, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात आहे. यामुळेच या तिघांनी परस्परांना मदत होईल अशी खेळी करण्यावर भर दिला आहे.
मनसेशी अधिकृतपणे युती किंवा हातमिळवणी झालेली नसली तरी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राज ठाकरे यांचा वापर कसा करता येईल यावर भाजपचा भर आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर २४ तासांत माहीम आणि सांगलीतील अनधिकृत बांधकाम हटविले होते. मात्र गेले चार दिवस शिंदे यांनी राज यांच्या टीकेला कोणतेही उत्तर दिले नव्हते. मात्र आज त्यांनी थेट ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ गाठले. सुमारे तासभर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटी दरम्यान राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे, आमदार सदा सरवणकर यांच्यासह मनसेचे काही पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीत निवडणुकांबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मशिदीवरील भोंग्यासंदर्भात चर्चा झाली असून नियम आहेत ते सर्वानी पाळले पाहिजेत. मशिदीवरील भोंग्याबाबत नियमानुसार कारवाई होईल असे शिंदे यांनी बैठकीनंतर सांगितले. तसेच या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तेदेखील तपासून घेऊन मगच निर्णय घेतला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही असे स्पष्ट केले.