मला मुख्यमंत्री करणार होते असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना केला आहे. पण अजित पवार आणि इतर कोणीतरी एकनाथ शिंदे नको असं सांगितलं असंही एकनाथ शिंदे म्हणाले. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी आपल्या दोन मुलांच्या मृत्यूचा उल्लेख करताना ते भावूकदेखील झाले.

ते म्हणाले की, “सुरुवातीला मला मुख्यमंत्री करणार होते. सर्व आमदारांना हे माहिती आहे. पण अजित पवार का इतर कोणी विरोध केला. आम्हाला सांगण्यात आलं की, ही जबाबदारी तुम्हालाच घ्यायची आहे. मी ठीक आहे म्हटलं. मी कधीही कोणत्याही पदाची लालसा केली नव्हती, कधी बोलणारही नाही. पण एकदा अजित पवार बोलता बोलता इथे पण अपघात झाला आहे असं बोलून गेले. मी बाजूला नेऊन विचारलं असता आमचा कोणाचा विरोध नाही, तुमच्या पक्षाचा निर्णय होता असं सांगितलं”.

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

“त्यानंतर मी सर्व विसरुन गेलो होतो. उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी सांगितल्याचं सांगण्यात आल्यानंतर मी एकाही शब्दाने बोललो नाही. पदाच्या लालसेपोटी आम्ही गेलो नाही. अन्यथा इतके मंत्री सत्तेच्या बाहेर आले नसते,” असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

‘मी पुन्हा येईन’ म्हणत टिंगलटवाळी करणाऱ्यांना फडणवीसांचा इशारा; म्हणाले “मी बदला घेणार, त्यांना…”

ज्या पद्धतीने सगळं सुरु होतं यामुळे हा निर्णय घेतला असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. “निवडून आलेल्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढची निवडणूक जिंकू की नाही असा प्रश्न त्यांना सतावत होता. भाजपाशी आपली नैसर्गिक युती असल्याचं ते सांगत मला उद्धव ठाकरेंशी बोला म्हणत होते. मी पाच वेळा प्रयत्न केला, केसरकार साक्षीदार आहे. आम्हाला त्यात यश मिळालं नाही,” असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.