मत्स्यदर्शन अधिक स्वच्छपणे होईल अशा काचा, माशांच्या रंगांना साजेशी रंगसंगती आणि एलईडीसारखी आधुनिक प्रकाशयोजना अशा नव्या रूपात १९५१ साली बांधण्यात आलेले तारापोरवाला आधुनिकीकरणानंतर मंगळवारी पुन्हा एकदा लोकांसाठी खुले झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी आधुनिक मत्स्त्यालयाचे उद्घाटन झाले. आतापर्यंत या मस्त्यालयात केवळ स्थानिक प्रकारच्या खाऱ्या आणि गोडय़ा पाण्यातील माशांच्या प्रजाती एकत्रितपणे ठेवल्या जात. त्याऐवजी खाऱ्या पाण्यातील तब्बल ६० ते ७० आणि गोडय़ा पाण्यातील २० ते ४० वेगवेगळ्या देशीविदेशी प्रजाती मत्स्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. अझुरा डॅमसेल, ब्ल्यू फाईन डॅमसेल, पर्पल फायर फिश, क्लाऊडी डॅमसेल, कॉपर बॅण्डेड बटरफ्लाय, व्हाइट टेल ट्रिगर, क्लोन ट्रिगर, टँगफिश आदी विविध प्रकारचे मनोहारी मासे मत्स्यालयात पाहता येतील. त्यासाठी सध्याच्या ५ ते १५ रुपये शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. नव्या दरवाढीनुसार १२ वर्षांच्या वरील व्यक्तीस ६० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले असून, १२ वर्षांखालील मुलांसाठी ३० रुपये, शैक्षणिक संस्थांच्या सहलीसाठी ३० रुपये, शासकीय अधिकाऱ्यांसाठी ४० रुपये, परदेशी पर्यटकांसाठी २०० रुपये, अपंगांसाठी ३० रुपये असे शुल्क असेल. मत्स्यालयात मोबाइलवरून छायाचित्रणासाठी ५०० रुपये, व्हिडीओ कॅमेऱ्याने शूटिंगसाठी १ हजार रुपये, तर व्यावसायिक शूटिंगसाठी १० हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार असून, दर्शनाची नोंदणी ऑनलाइनही करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.



