scorecardresearch

..त्यांनी मला ओळखलेच नाही!

‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सूचक विधान

‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सूचक विधान

मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी समसमान पद्धतीने वाटून घेण्याचे ठरले असतानाही भाजपने ते वचन मोडले. इतकेच नव्हे तर मला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच मी टोकाचा निर्णय घेऊन कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मी इतका टोकाचा निर्णय घेईन, असे भाजपला वाटले नसेल तर त्यांनी मला ओळखलेच नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या वर्धापनदिन सोहळ्यातील मुक्तसंवादात लगावला.

नरिमन पॉइंटमधील एक्स्प्रेस टॉवरच्या हिरवळीवर ‘लोकसत्ता’च्या ७२ व्या वर्धापनदिनाच्या दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मुक्तसंवाद साधला. यावेळी ‘लोकसत्ता वर्षवेध’ या अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी केकही कापण्यात आला. एक्स्प्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका हे यावेळी उपस्थित होते. कधी कोपरखळ्या मारत, कधी चिमटे काढत तर कधी ठाकरी बाणा दाखवत मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीचे सरकार, भाजपसह तुटलेली युती, पर्यटन अशा विविध विषयांवर मनमोकळे भाष्य केले. निवृत्त होण्याच्या वयात मला नोकरी लागली आहे, असा विनोदही उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदावर केला. मावळत्या दिनकरामुळे आकाशात पसरलेली भगवी छटा, मरिन ड्राईव्हवरून येणारा गार वारा अशा प्रसन्न वातावरणात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या अनौपचारिक संवादाला विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कोणतेही सरकार हे घटनाबाह्य़ काम करूच शकत नाही. ते घटनेच्या चौकटीतच अस्तित्वात येते. मी मुख्यमंत्रीपदाची शपथही घटनेला धरूनच घेतली, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानावरून सुरू झालेल्या वादावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. कदाचित ते विधानच घटनाबाह्य़ होते की नाही ते माहिती नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

मी मुख्यमंत्री होईन असे कधी मला वाटलेही नव्हते. भाजपसोबत आमचे जुने ऋणानुबंध होते. २०१४ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत युती तोडली असली तरी नंतर राज्य सरकारमध्ये पुन्हा एकत्र आलो होते. नंतर लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा आमचा निर्णय झाला होता. भाजपने युतीचा आग्रह धरल्यावर लोकांना व शिवसैनिकांना काय सांगणार होतो. त्यामुळे केवळ लोकसभेसाठी युती करणार नाही. विधानसभेसाठीही युती व्हावी अशी आमची अट होती. सर्व सत्तापदांची जबाबदारी समसमान असावी असे वचन भाजपने दिल्यावरच लोकसभेला युतीसाठी होकार दिला. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र भाजपने वचन मोडले. इतकेच नव्हे तर मला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला, याचे खूप वाईट वाटले. ते सहन करणे शक्यच नव्हते. त्यातूनच वेगळा निर्णय घेतल्याचे ठाकरे यांनी सांगितले. तुम्ही इतका टोकाचा निर्णय घ्याल, याचा अंदाज न आल्यानेच भाजपने तुमची अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी मान्य केली नाही का असे विचारता, मी टोकाचा निर्णय घेणारच नाही असे भाजपला वाटले असेल तर त्यांनी मला ओळखलेच नाही, असा खरमरीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

‘लोकसत्ता वर्षवेध’चे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी (डावीकडून) केसरी टूर्सचे शैलेश पाटील, इन्फ्राटेकचे किसनराव राठोड, एम के घारे ज्वेलर्सचे उदय घारे, ठाणे जनता सहकारी बॅंकेचे विवेकानंद पत्की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ई. रविंद्रन, एक्स्प्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तन्वी हर्बल्सच्या डॉ. मेधा मेहंदळे, ग्रॅव्हीटस फाऊंडेशनच्या उषा काकडे, सिडकोच्या प्रिया रातांबे, लक्ष्य अकॅडमीचे अजित पडवळ आणि भारत पेट्रोलियमचे नोरी प्रभाकर. छाया : गणेश शिर्सेकर

आता एकदा मी वेगळी सुरुवात केली आहे. त्यामुळे आता मागे वळून पाहण्याचा विषयच नाही. समोरच पाहून वाटचाल करणार. कदाचित मी पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री व्हावे अशीच भाजप नेत्यांची व त्यांच्या दिल्लीतील नेतृत्वाची इच्छा असेल म्हणूनच त्यांनी अडीच वर्षांंचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास नकार दिला, असेही ठाकरे उपरोधिकपणे म्हणाले. भाजपने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास तयारी दर्शवली असती तर मी नव्हे तर कोणी शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पहिले कोण हा विषय नव्हता. आधी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर अडीच वर्षांनंतरची तारीख टाकून राजीनामापत्रावर मुख्यमंत्र्यांची व माझी सही घेऊन ती मंत्रालयात लावा इतपत माझी तयारी होती. पण वेळ गेली ती गेली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह आघाडी सरकार स्थापन करण्याचे ठरवल्यावर त्यांनी मीच मुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असा आग्रह धरण्यात आला, असेही ठाकरे यांनी सांगितले.

सध्या मी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुखपद अशी कसरत सांभाळत असलो तरी कोणीही एका जागेवर कायमचा नसतो. मी कधीपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख राहायचे याचा निर्णय शिवसैनिक घेतील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर शिवसैनिकांना व्यक्तीगत भेटायचो ते थोडे कमी झाले आहे. पण आठवडय़ातून एक दिवस त्यासाठी द्यायचा असे ठरवले आहे. त्यांच्यासाठी ‘मातोश्री’ची दारे सदैव खुली आहेत, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

महाविकास आघाडी सरकारने पहिल्या दोन महिन्यांत शेतकरी कर्जमाफी व शिवभोजन हे दोन मोठे निर्णय घेतले आहेत. सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यावर संपूर्ण आढावा घेऊ व पुढील दिशा ठरवू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर अयोध्येला जाणार असून राम मंदिर ही काही खासगी मालमत्ता नाही, असे सांगत त्यावेळी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नेते सोबत आले तर त्यांनाही सोबत नेईन, असे त्यांनी सांगितले.

‘मी लोकसत्ता रोज वाचतो’

आम्ही सामना वाचत नाही, असे काही लोक म्हणतात. मी मात्र तसा नाही. मी ‘लोकसत्ता’ रोज वाचतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.

पर्यटन सुधारणांसाठी प्रयत्नशील

जंगलात जे आहे त्यास वाइल्ड का म्हणतात तेच समजत नाही. खरे तर ते प्राणी निसर्गाचे सर्व नियम पाळतात. आपण मात्र निसर्गाचे नियम मोडून स्वत:ला सुशिक्षित समजतो, अशी कोपरखळीही उद्धव ठाकरे यांनी लगावली. मी अनेकदा जंगलात गेलो. यापुढेही जंगल, लेण्या, लोणार अशा ठिकाणी विविध क्षेत्रांतील प्रथितयश लोकांना घेऊन जाणार आहे. म्हणजे तेथे पर्यटनासाठी कोणत्या सोयी-गैरसोयी आहेत हे समजेल व त्यात सुधारणा करता येतील, असेही ठाकरे यांनी जाहीर केले.

शेतकरी कर्जमाफी हा प्रथमोपचार

शेतकरी कर्जमाफी हा कृषीसमस्येवरील पूर्ण उपाय नाही याची जाणीव आहे पण तो प्रथमोपचार नक्कीच आहे. सर्व आटापिटा दोन घास खाण्यासाठी असून तिजोरीवर ताण पडला तरी अन्न देणाऱ्याला मदत केलीच पाहिजे. नंतर शेतकऱ्यांना पायावर उभे करण्यासाठी उपाययोजना केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांची मांदियाळी

राजकारण- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री संजय बनसोडे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत व अरविंद सावंत, भाजपचे नेते व आमदार आशीष शेलार, कॉंग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ, शिवसेना आमदार मनीषा कायंदे, महापौर किशोरी पेडणेकर, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत व अतुल लोंढे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय तटकरे.

सनदी अधिकारी – मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, मुख्यमंत्रांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ सदस्य सचिव ई. रवींद्रन,  मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, परिवहन आयुक्त शेखर चन्न्ो,  महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर,

पोलीस – लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे महासंचालक परमबीर सिंग, राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख देवेन भारती, राज्य महामार्ग पोलीस विभागाचे अतिरिक्त महासंचालक विनय कारगावकर, महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे, सहआयुक्त (वाहतूक) मधुकर पांडे, अतिरिक्त आयुक्त (संरक्षण व सुरक्षा) डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, विशेष शाखेच्या अतिरिक्त आयुक्त सुप्रिया पाटील-यादव, उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर.

उद्योग- ‘आरपीजी एंटरप्राईजेस’च्या कंपनी व्यवहार विभागाचे प्रमुख अमर जाधवराव, ‘कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’च्या पश्चिम विभागाचे उप संचालक मोहन गावडे, ‘अपना बँके’चे अध्यक्ष दत्ताराम चाळके, ‘भारत पेट्रोलियम’चे एस. सुंदरराजन, ‘निप्पॉन इंडिया एएमसी’चे संदीप वाळुंज, ‘कालनिर्णय’चे जयराज साळगावकर, ‘सीडीएसएल’चे अजित मंजुरे, चित्रलेखा वैद्य.

क्रीडा – नदीम मेमन (मुंबई शालेय क्रीडा संघटनेचे सचिव), शैला कनुंगो (नेमबाजी संघटक), वर्षां उपाध्ये (जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक), नीता ताटके (मल्लखांब प्रशिक्षक), विश्वास मोरे (कबड्डी संघटक), बाळ तोरस्कर (महाराष्ट्र खो-खो संघटनेचे प्रसिद्धी सचिव), अरुण देशमुख (महाराष्ट्र खो-खो संघटनेचे पदाधिकारी), दिनेश लाड (क्रिकेट प्रशिक्षक), एन. बी. मोटे (महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाचे उपसंचालक), आरती बारी (आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच), कोमल देवकर (शिवछत्रपती पुरस्कार विजेती कबड्डीपटू), सायली जाधव (आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू).

शिक्षण – आयसीटी कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय भामरे,

आरोग्य – हिंदुजा रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अविनाश सुपे, डीएमईआरचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, डॉ. गुस्ताद डावर व  स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा डावर.

मनोरंजन – नाटय़संमेलन अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाटय़ निर्माता संघाचे अध्यक्ष अजित भुरे, संगीतकार राहुल रानडे, आदेश बांदेकर (अभिनेते), पद्मिनी कोल्हापूरे (अभिनेत्री, प्रवास सिनेमा), शशांक उदापुरकर (लेखक-दिग्दर्शक, प्रवास सिनेमा), अजय भाळवणकर (व्यवसाय प्रमुख, सोनी मराठी) अमित भंडारी (फिक्शन प्रमुख, सोनी मराठी), मंगेश कुलकर्णी (व्यवसाय प्रमुख, झी स्टुडिओ), गणेश गारगोटे (जनसंपर्क प्रमुख, मीडिया वन), विनोद सातव (जनसंपर्क अधिकारी,), सांस्कृतिक कार्य संचलनालय बिभीषण चौरे.

इतर – मुंबई रेल्वे विकास महामंडळ अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक रवी शंकर खुराना, मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क आधिकारी शिवाजी सुतार, लोकसत्ताचे मुंबईतील वितरक अंबिका एजन्सीचे प्रविण शिंगोटे, तळेकर, सी.एन.ए. एजन्सीचे सोनी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे, वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे, महापालिका आयुक्तांचे माध्यम सल्लागार राम दोतोंडे, ज्येष्ठ वकील अनिल साखरे,  शिव केबल सेनेचे सरचिटणीस विनय पाटील, संचालक, ‘सिडको’च्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra cm uddhav thackeray at loksatta anniversary event zws

ताज्या बातम्या