मुंबई : आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेबसंवादात उद्या, रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. दुपारी १२.३० वाजता हा संवाद सुरू होईल.

‘दृष्टी’  आणि ‘कोन’ या वेबसंवादात काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपनेते आमदार आशीष शेलार यांनी आपापल्या पक्षांची भूमिका मांडली. या वेबसंवादाचा समारोप मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संवादाने होईल.

राज्यासमोरील प्रश्न, केंद्र आणि राज्य संबंध, मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठणावरून रंगलेले राजकारण, महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपने उघडलेली आघाडी, मुंबईसह अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका, तीन पक्षांचे सरकार चालविताना करावी लागणारी कसरत, महाविकास आघाडीतील नेत्यांवर होणारे आरोप, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि त्यांची अंमलबजावणी, शिवसेनेची वाटचाल अशा विविध विषयांवर मुख्यमंत्री उहापोह करण्याची शक्यता आहे.

 या वेबसंवादात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षांतर्गत घडामोडींवर परखड भाष्य केले होते. भाजप थिल्लर आणि धार्मिक विद्वेषाचे राजकारण करीत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. भाजप नेते आशीष शेलार यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची तुलना करीत उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे भाजप आणि शेलार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

सहप्रायोजक  : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

सहभागासाठी..  http:// tiny.cc/LS_Drushti_ani_Kon2022 येथे ऑनलाइन नोंदणी किंवा क्यू आर कोडद्वारे या वेबसंवादात सहभागी होता येईल.