राज्यांच्या कारभारात लुडबुड नको ! केंद्राच्या दडपशाहीला मुख्यमंत्री ठाकरे यांचे आव्हान

मराठी-अमराठी भेद विसरून हिंदूंची एकजूट करा. हिंदू तितुका मेळवावा हिंदुस्थान धर्म वाढवावा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

मुंबई : राज्यघटनेप्रमाणे देशात संघराज्य व्यवस्था असून केंद्राइतकेच अधिकार राज्यांना आहेत. राज्यांच्या दैनंदिन कारभारात केंद्राची लुडबुड आणि दडपण नसावे ही भूमिका सर्व राज्यांनी घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या संघराज्यविरोधी कारभाराला आव्हान दिले. तसेच सत्तांध भाजपशी लढण्यासाठी जात-पात विसरून मराठी माणसाची एकजूट करा आणि मराठी-अमराठी भेद विसरून हिंदूंची एकजूट करा. हिंदू तितुका मेळवावा हिंदुस्थान धर्म वाढवावा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुंबई आणि महाराष्ट्रासाठी केलेल्या विकासकामांची माहिती देत हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असून भाजपमधील उपटसुंभ नवहिंदूंमुळे देशात हिंदुत्वाला धोका असल्याची टीका ठाकरे यांनी केली. हिंदुत्वाचे तुमचे विचार तुमचीच माणसे ऐकणार नसतील तर काय उपयोग, असा सवालही ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना केला. तुम्ही म्हणता आपले सर्वाचे पूर्वज एक होते. मग उत्तर प्रदेशातील ज्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले त्यांचे पूर्वज परग्रहावरून आले होते काय, हे सर्व प्रकार तुम्हाला मान्य आहेत काय, असा सवाल ठाकरे यांनी भागवत यांना केला. सत्तेचे व्यसन हे अमली पदार्थासारखेच घातक असते, याचा बंदोबस्त कोण करणार? अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे ते व्यसन करणाऱ्या माणसाचे घरदार उद्ध्वस्त होते. पण सत्तेचे व्यसन लागलेल्यांमुळे लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते, अशी टीका भाजपवर करत ते व्यसन देशातून नष्ट केले पाहिजे, असे मतही मुख्ममंत्र्यांनी व्यक्त केले.

देशात आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा साजरा होणार आहे. देशाने काय कमावले आणि काय गमावले याचा विचार करण्याची ही वेळ आहे. महिला अत्याचार आणि संघराज्य व्यवस्था या विषयांवर गांभीर्याने मंथन व्हायला हवे. देशात केंद्राइतकेच राज्य सरकारांना ही अधिकार असतील आणि राज्ये सार्वभौम असतील, असे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. मात्र सध्या तसे होत नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलीच सत्ता हवी या सत्तेच्या व्यसनाच्या अंमलाखाली असणाऱ्यांनी संघराज्य व्यवस्था मोडीत काढत राज्यांच्या दैनंदिन कारभारात हस्तक्षेप सुरू केला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणले.

इंग्रजांच्या निरंकुश सत्तेला पंजाब, महाराष्ट्र आणि बंगालच्या लाल, बाल आणि पाल या त्रयीने आव्हान दिले होते याची आठवण करून देत आताही बंगालमध्ये ममता दीदी, महाराष्ट्रात शिवसेना आणि पंजाबमध्ये काँग्रेस मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात संघर्षांला सज्ज असल्याचे  ठाकरे यांनी सांगितले. भाजपच्या दडपशाहीविरोधात बंगालमध्ये ममतादीदींनी जिद्दीने संघर्ष करत यश मिळवले. महाराष्ट्रात अशाच संघर्षांला सज्ज व्हा, महाराष्ट्रातील ‘हर हर महादेव’ची ताकद काय असते, हे दिल्लीच्या तख्ताला दाखवायचे आहे, असे आवाहनही ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.

देशात हिंदुत्वाला धोका नाही असे उत्तर केंद्रीय गृहमंत्रालयाने माहितीच्या अधिकारात दिले आहे. मात्र हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही शिवसेनेची भूमिका असून या राष्ट्रीयत्वाला आणि हिंदुत्वाला भाजपच्या उपटसुंभ नवहिंदूंमुळे धोका निर्माण झाला आहे. हिंदुत्वाची शिडी करून सत्तेवर चढणारी ही मंडळी जात-पात-प्रदेश यावरून लोकांमध्ये फूट पाडण्याचे इंग्रजांचे फोडा आणि झोडा हे धोरण राबवत आहेत, आरोप ठाकरे यांनी केला. घाटी-कोकणी, जात-पात हे भेद विसरून मराठी माणसांची एकजूट करा. मराठी आणि अमराठी हा भेद विसरून हिंदूंची एकजूट करा,  असे आवाहनही ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी मराठी-अमराठी वाद नको, असे सांगत हिंदुत्वाचा मुद्दा प्राकर्षांने मांडला.

करोनानंतरच्या परिस्थितीमुळे अनेक जागतिक कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत. त्यापैकी काही महाराष्ट्रात याव्यात यासाठी महाविकस आघाडी काम करत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मी पुन्हा येईन, मी गेलोच नाही..

मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखेच वाटते, या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा ठाकरे यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘आधी म्हणायचे मी पुन्हा येईन, आता म्हणतात मी गेलोच नाही, मी गेलोच नाही. सत्ता येते आणि जाते पण ती डोक्यात जाता कामा  नये. अहंकार असता कामा नये. शिवसेनेला दिलेले वचन पाळले असते तर सत्ता गेली नसती. आज तुम्ही मुख्यमंत्री असता किं वा नंतर मुख्यमंत्री झाला असता.’’  शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवून कदचित मीही राजकारणातून बाजूला झालो असतो. केवळ जबाबदारीच्या भावनेने मी राजकारण आणि मुख्यमंत्रीपद सांभाळत आहे. शिवसेनाप्रमुखांना मुख्यमंत्रीपदाचे दिलेले वचन मी पाळले. पण त्यांना दिलेला शब्द अजूनही अंमलात आणायचा आहे. तो म्हणजे शिवसेनेची स्वबळावर सत्ता, असे सांगत ठाकरे यांनी शिवसेनेचे १०० टक्के  सत्तेचे स्वप्न पुन्हा अधोरेखित के ले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले ते सत्यच

भाजपमध्ये प्रवेश के ल्याने वाचलो, हे हर्षवर्धन पाटील म्हणाले ते सत्यच आहे. असे लोक आता भाजपचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर झाले आहेत. भाजपमध्ये गेल्यावर पावन होतात. बाकीच्यांच्या मागे ईडी, सीबीआय, आयकर खाते अशा विविध यंत्रणांच्या चौकशांचा ससेमिरा लावला जातो. के ंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून पडद्याआडून अंगावर जाता. राजकीय आव्हान द्यायचे आणि ईडी, सीबीआयच्या मागे लपायचे हा नामर्दपणा आहे. हे मर्दाचे लक्षण नाही. हिंमत असेल तर समोरासमोर या, असे आव्हानही ठाकरे यांनी भाजपला दिले.

गुजरातमध्ये सापडला तो साठा कसला?

महाराष्ट्र ही अंमली पदार्थाची राजधानी असल्याचे चित्र केंद्र सरकार आणि भाजप उभे करीत आहे. अंमली पदार्थाची कीड समूळ नष्ट झालीच पाहिजे, यात दुमत नाही. शेजारील गुजरातमध्ये अदानीच्या बंदरात काही हजार कोटींचा अंमली पदार्थाचा साठा सापडला. त्याबाबत कोणी काही बोलत नाही. राज्यात मुंबई पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांनी के लेल्या कारवाईची तुलना के ल्यास मुंबई पोलिसांची कामगिरी अधिक सरस आहे. असे असूनही राज्याला बदनाम के ले जात असल्याची टीकाही ठाकरे यांनी के ली. भाजपची भूमिका ही प्रेयसीवर एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्यांसारखी आहे. आमची सत्ता नाही तर आम्ही महाराष्ट्राची प्रगती होऊ देणार नाही असे त्यांचे वर्तन आहे, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढविला.

ठाकरेंची टोलेबाजी

’ गांधीजी आणि सावरकर यांचे नाव घेण्याची या लोकांची पात्रता आहे का? त्यांनी देशासाठी आयुष्य वेचले, तुम्ही काय केले?

’केंद्रात मोदी सरकार आल्यापासून गुजरातला मिळणारा सामाजिक उत्तरदायित्व निधी ३५० टक्के वाढला, तरीही वाचा आणि थंड बसा..  

’शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदुत्वाचा विचार समान असला तरी हिंदुत्वाबद्दलची धारा वेगळी आहे.

’स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतला नाही, पण आता ‘भारत माता की जय’ घोषणा देऊन राष्ट्रभक्त असल्याचे भासवले जाते, हा सीमेवरील जवानांचा अवमान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra cm uddhav thackeray slams devendra fadnavis other bjp leaders at dussehra rally zws

Next Story
पं. मनोहर चिमोटे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी