मुंबई:  राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठय़ावरच रोखावे लागेल. राज्यात पुन्हा र्निबध नको असतील तर नागरिकांनी स्वत:हून मुखपट्टी वापरणे, लस घेणे अपरिहार्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. रुग्णांमध्ये ताप तसेच अन्य लक्षणे आढळल्यास त्यांची तत्काळ आरटीपीसीआर चाचणी करण्याचे व लसीकरणाचा वेग वाढविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तर राज्यात मुखपट्टी सक्तीची करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असून त्यावर विचार करू, असे उत्तर ठाकरे यांनी दिले.

 काही राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेत वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करत सावधगिरीची सूचना दिली. या पाश्र्वभूमीवर ठाकरे यांनी सायंकाळी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी संवाद साधून करोना स्थितीचा आढावा घेतला. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, करोना नियंत्रण कृती गटाचे अध्यक्ष डॉ संजय ओक, सदस्य शशांक जोशी, डॉ राहुल पंडित यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

चीनमध्ये ४० कोटी जनता सध्या टाळेबंदीत आहे.  करोनाच्या तीन लाटांच्या वेळी र्निबधांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली,  मात्र आता या सगळय़ा गोष्टी टाळण्यासाठी करोनापासून सुरक्षित ठेवणारे नियम अंगीकारणे आवश्यक आहे. त्यात मुखपट्टी वापरणे, हात स्वच्छ ठेवणे आदींचा समावेश आहे.  करोनाकाळात सुरू केलेल्या आरोग्य सुविधा आपण बंद केल्या नसल्या तरी पुन्हा त्या वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

चाचण्या वाढवा: चाचण्या वाढवण्याची गरज असून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. जनजागृती मोहीम पुन्हा राबवावी, राष्ट्रीय सरासरीपेक्षा राज्याचे काम वरचढ राहील यादृष्टीने नियोजनपूर्वक प्रयत्न करावेत, आरोग्य संस्थांमधील सर्व संयंत्रांची देखभाल दुरुस्ती करताना अग्निसुरक्षेचे ऑडिटचे कामही पूर्णत्वाला न्यावे असेही टोपे यावेळी म्हणाले.