महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचं घर बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचा दावा केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राणे पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना माझं घरं पाडायचं होतं. पण त्यांचंच घर बेकायदेशीरपणे बांधण्यात आलं आहे. पण ते मी पाडणार नाही,” असंही ते म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेनं फेब्रुवारी २०२० मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एक नोटीस बजावली होती. राणे यांनी महापालिकेची परवानगी न घेता जुहू येथे बंगला बांधल्याचा आरोप संबंधित नोटीशीत केला होता. तसेच संबंधित कायदपत्रे दाखवले नाहीत, तर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेनं दिला होता. पण केंद्रीय मंत्र्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.

दरम्यान, सोमवारी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विविध मुद्द्यांवरून हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते. आज बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी उद्धव यांना कधीच मुख्यमंत्री बनवलं नसतं, असंही ते म्हणाले. शनिवारी मुंबईतील बीकेसी मैदानावर झालेलं उद्धव ठाकरेंचं भाषण अत्यंत ‘बोगस’ होतं, असा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला.

“संबंधित भाषणात उद्धव म्हणाले की, त्यांचं हिंदुत्व घरे जाळणारं नाही तर लोकांच्या घरातील चूल पेटवणारं आहे. मला उद्धवजींना विचारायचं आहे की, त्यांनी किती तरुणांना नोकऱ्या दिल्या? किंवा किती घरांमध्ये चुली पेटवल्या आहेत?” असा सवालही नारायण राणे यांनी यावेळी विचारला आहे.

“आतापर्यंत मुंबईत ७५ टक्के सांडपाण्याचं काम व्हायला हवं होतं. मात्र अजूनही बरीच कामं बाकी आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांचे प्रचंड हाल होणार आहेत. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल,” असंही ते पुढे म्हणाले.