मुंबई : चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील ‘ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’च्या चौथ्या वर्षाच्या अमलबजावणीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक,

प्राध्यापकांसाठी तीन दिवसीय विशेष ऑनलाईन प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये राज्यतील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक आणि प्राध्यापक यांनी सहभागी होणे अनिवार्य असल्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’च्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्यात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील चौथे वर्ष लागू होत आहे. या नव्या टप्प्याची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. उच्च शिक्षण व्यवस्थेत लवचिकता, संशोधनाभिमुखता आणि विद्यार्थी-केंद्रितता वाढविण्यासाठी ही पुनर्रचना अत्यंत महत्त्वाची असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

…म्हणून प्रशिक्षण सक्तीचे

क्रेडिट फ्रेमवर्क, मल्टिपल एंट्री अँड एक्झिट आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स’ यांसारख्या तांत्रिक बाबींचे सखोल ज्ञान संस्थाप्रमुखांना व्हावे, तसेच अमलबजावणीत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी हे प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व विद्यापीठे, तसेच संलग्न आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून चौथे वर्ष लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

प्रभावी अमलबजावणीमुळे महाराष्ट्र आदर्श ठरेल

चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील ‘ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’च्या चौथ्या वर्षाच्या या निर्णयाची प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणी झाल्यास देशातील इतर राज्येही महाराष्ट्राचा आदर्श घेतील, असा ठाम विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. राज्य सरकार या धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पूर्णपणे सकारात्मक आणि कटिबद्ध भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नव्या अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक तत्त्वे

नव्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद करून चंद्रकांत पाटील यांनी महासार्कचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले.