मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने निर्बंध शिथिल करण्यात येत असून, शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयेही सुरू होणार आहेत. २० ऑक्टोबरपासून (बुधवार) महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी केली.

करोनामुळे राज्यातील महाविद्यालये गेल्या दीड वर्षांपासून बंद होती. शाळा सुरू झाल्याने महाविद्यालये कधी सुरू होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित (पान २ वर) (पान १ वरून)  पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.

महाविद्यालये सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर करण्यात आली आहेत.  महाविद्यालयात येणारे प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण बंधनकारक आहे. तसेच करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या (१८ वर्षांवरील) विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल. १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना लसीकरण झाल्याचा दर्जा देण्यात आल्याने त्यांना लशीच्या दोन मात्रांची अट लागू नाही. त्यांना वर्गात बसता येईल. तसेच विद्यापीठ, महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, असे सरकारने म्हटले आहे.

विद्यापीठ-महाविद्यालयांचे वर्ग पूर्ण की निम्म्या क्षमतेने सुरू करायचे, याबाबत स्थानिक प्राधिकरणाशी चर्चा करून विद्यापीठांनी निर्णय घ्यायचा आहे. करोना प्रतिबंधित क्षेत्रात येणारी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये ही ज्या महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत येतात, त्यांनी तेथील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे. करोनाचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती, प्रतिबंधित क्षेत्रांचे नियोजन व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता याबाबत चर्चा करून महाविद्यालये सुरू करावीत, अशी सूचना करण्यात आली आहे.

सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांनी करोना व्यवस्थापनाबाबतचे केंद्राचे निर्देश, कामांच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निर्देश, राज्य शासनाने वेळोवेळी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्वे, तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वसतिगृहे टप्प्याटप्प्याने सुरु करण्याबाबत उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण संचालकांनी आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही सामंत यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना रेल्वेप्रवासाची प्रतीक्षाच

मुंबई महानगर प्रदेशातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याबाबत मुख्य सचिवांकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांची प्रवासप्रतीक्षा कायम आहे.

आव्हान काय?

महाविद्यालयांत प्रत्यक्ष उपस्थित राहता न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना राज्य सरकारने महाविद्यालयांना केली आहे. तसेच लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून महाविद्यालयातच विशेष मोहीम राबवत लसीकरण पूर्ण करण्याची सूचना सरकारने केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आणि ऑनलाइन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याचे आव्हान महाविद्यालयांपुढे असेल.