मुंबई : काँग्रेस पक्षाने संघटन सृजन अभियाना अंतर्गत ६९ नव्या जिल्हाध्यक्षांची निवड केली आहे. या निवडीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न पक्षाकडून झाला आहे. या निवडीनंतर ठिकठिकाणी पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. पक्षांतर्गत वादातून अमरावती व नागपूर ग्रामीणसह काही जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.
जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीसाठी पक्षाने वेगळा प्रयोग केला आहे. पक्षाने नियुक्त केलेल्या निरीक्षकांनी दहा दिवस जिल्ह्यात मुक्काम करीत पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यांमधून सहा नावांची शिफारस करण्यात आली होती. त्यातून जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या करताना सर्व समाजघटकांना सामावून घेतल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. यामध्ये खुल्या प्रवर्गातून – २४, इतर मागासवर्ग – २२, अल्पसंख्याक ७, अनुसूचित जाती – ७, अनुसूचित जमाती – ३, भटक्या विमुक्त जाती-जमाती – २ तर ३ महिला जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये सुनील केदार तर अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर यांनी आक्षेप घेतल्याने या दोन्ही ठिकाणी नियुक्ती रखडली आहे. काही जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांवरून नाराजीनाट्य व राजीनामानाट्य घडले आहे. काही ठिकाणी नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात पक्षाने चार जिल्हाध्यक्ष नेमले असून पुणे पूर्वच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जगताप, पुणे पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदी दीप्ती चौधरी, पुणे ग्रामीण उत्तराच्या जिल्हाध्यक्षपदी कमलाकर सातव आणि पुणे ग्रामीण दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी लहु नवंगुणे यांची नियुक्ती झाली आहे. ठाणे शहर अध्यक्षपदी राहुल पिंगळे तर ठाणे ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी चेतनसिंग पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. उल्हासनगर शहराध्यक्षपदी रोहित साळवे,वसई-विरारच्या जिल्हाध्यक्षपदी कॅप्टन नीलेश पेंढारी यांची नियुक्ती झाली आहे.
अहिल्यानगर शहराध्यक्ष म्हणून दीप चव्हाण, अहिल्यानगर ग्रामीण उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन गुजर तर अहिल्यानगर ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील यांची नेमणूक केली आहे. नाशिक शहर जिल्हाध्यक्षपदी नीलेश खैरे, नाशिक ग्रामीण उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश कहांडोले तर नाशिक ग्रामीण दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी भारत टेकेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भिवंडी शहर- अबीद खान मुनसफ, धुळे शहर- खान मोहम्मद सबीर, धुळे ग्रामीण- युवराज करंकाळ, जळगाव शहर-जमील शेख, जळगाव ग्रामीण पूर्व – धनंजय चौधरी, जळगाव ग्रामीण पश्चिम- अविनाश भालेराव, कल्याण शहर- नवीन सिंग, मीरा भाईंदर शहर- राकेश राजपुरोहित, नागपूर शहर -प्रफुल्ल गुडधे, नंदुरबार -दीपक पटेल, नवी मुंबई शहर- रामचंद्र दळवी, रायगड उत्तर- डॉ. मनीष पाटील , रायगड दक्षिण- राजेंद्र ठाकूर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी २६ ते ३० मे या कालावधित विभागनिहाय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
