scorecardresearch

राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे ; प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत ठराव

राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्ष व्हावे, अशी भूमिका घेतली आहे.

राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे ; प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत ठराव
भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केरळमधील अलपुझ्झा जिल्ह्यातील वडक्कल समुद्रकिनारी मच्छीमारांशी संवाद साधला.

मुंबई : राजस्थान, छत्तीसगड, गुजरातच्या धर्तीवरच अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्षपद खासदार राहुल गांधी यांनी स्वीकारावे, अशी विनंती करणारा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसच्या बैठकांमध्ये मंजूर करण्यात आले.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्ष व्हावे, अशी भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष, पदाधिकारी तसेच अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रतिनिधी निवडण्याचे अधिकारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्याचा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला  प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>> ‘भारत जोडो’ यात्रेला चांगला प्रतिसाद -पवार

या बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे  प्रतिनिधी यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते  बाळासाहेब थोरात यांनी त्याला अनुमोदन दिले व सर्व प्रदेश प्रतिनिधींनी हा ठराव एकमताने मंजूर केला. त्याचबरोबर खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी अशी विनंती करणारा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला. प्रदेश कार्याध्यक्ष  चंद्रकांत हंडोरे व नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले, हा ठरावही सर्व प्रतिनिधींनी एकमताने मंजूर केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर सुरू असलेली भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येणार आहे, या यात्रेच्या तयारीबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपद स्वीकारावे, असा ठराव मंजूर करण्यात आला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.