मुंबई : काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष निवडींच्या प्रचलीत पद्धतीला बगल देण्यासाठी ‘संघटन सृजन’ अभियान राबविण्यात येत असून जिल्ह्यातील वर्षानुवर्षाची पक्षातील आपली एकाधिकारशाही संपणार या भीतीने काँग्रेसच्या उरल्यासुरल्या प्रस्थापित नेत्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या सूचनेनुसार हे अभियान राबविले जात आहे. राज्य काँग्रेस संघटनेत ६० जिल्हे होते. शहरी भागातील विस्तार लक्षात घेऊन प्रदेश काँग्रेसने त्यामध्ये १२ जिल्हे वाढवले आहेत. या सर्व ७२ जिल्हा अध्यक्षांच्या निवडी ‘संघटन सृजन’ अंतर्गत होत आहेत.
या अभियानांतर्गत केंद्रीय निरीक्षक जिल्ह्यात सात दिवस मुक्काम करतील. आजी-माजी आमदार, पक्षातील आघाड्यांचे प्रमुख, स्थानिक स्वराज्य संस्थांतील पक्षाचे प्रतिनिधी यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करतील. त्यानंतर केंद्रीय समितीकडे जिल्हाध्यक्षांच्या चार पाच नावांची शिफारस करतील. निरिक्षकांशी चर्चा करुन केंद्रीय समिती जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर करणार आहे. महिनाअखेरीस राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांच्या निवडींची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
राज्यात काँग्रेसची संघटना खिळखिळी आहे. तालुका व जिल्हाध्यक्ष प्रदेश पदाधिकाऱ्यांना जुमानत नाहीत. बैठकांना येत नाहीत की दूरध्वनीही घेत नाहीत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सदर अभियान तालुक्यातही राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे मोक्याच्या पदावर ठाण मांडून बसलेल्यांची पंचाईत झाली आहे. पक्षाचे राज्यात ६७५ तालुके असून प्रत्येक तालुक्यात विविध आघाड्यांच्या अध्यक्षांसह ११ पदे निवडली जाणार आहेत. या निवडींमुळे तालुका पातळीवर ७ हजार तरुण कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी मिळणार आहे.
राहूल गांधी यांच्या पुढाकाराने २०१७ मध्ये युवक आघाडीच्या नियुक्त्या निवडणुकीच्या मार्गाने करण्याची पद्धत आणली होती. परंतु, या निवडणुकीमध्ये पक्षातील मातब्बर नेत्यांच्या मुलांची अध्यक्षपदी वर्णी लागल्याने त्याचे हसे झाले होते. ‘संघटन सृजन’ला पक्षातील प्रस्थापितांचा विरोध असल्याने ही नवी पद्धती कितपत यशस्वी होईल याविषयी शंकाच आहेत.
यापुढे पक्षात जिल्हाध्यक्ष पदाला अत्यंत महत्व असेल. हे पद दिल्लीतून निश्चित होईल. प्रदेशाध्यक्षपदाचे जिल्हापातळीवर सर्व अधिकार या पदावरील व्यक्तीला असणार आहेत. त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. – सचिन सावंत, सरचिटणीस, प्रदेश काँग्रेस
अभियानास विरोध –
परळच्या टिळक भवन मुख्यालयात ३१ मार्च रोजी ‘संघटन सृजन’बाबत बैठक पार पडली. या बैठकीत ‘पलुस -कडेगाव’चे आमदार विश्वजीत कदम यांनी ‘आमच्या जिल्ह्यात उगाच ढवळाढवळ करू नका. आमची घडी व्यवस्थित बसलेली आहे.’ असा इशारा प्रदेश पदाधिकाऱ्यांना दिला. आश्चर्य म्हणजे या बैठकीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक खासदार व आमदार व ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
