काँग्रेसचे राज्यभर आंदोलन, अशा कारवाईला घाबरत नाही;  पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा

काँग्रेस इंग्रजांना घाबरली नाही तर ‘यांना’ काय घाबरणार? भाजप विरोधातले आंदोलन आणखी तीव्र करणार आहे

maharashtra congress stages protests
काँग्रेसचे आंदोलन

मुंबई : राहुल गांधी यांनी अदानी उद्योगसमुहातील महाघोटाळा उघड केल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारची जगभर नाचक्की झाली आहे. अदानीच्या कंपनीत वीस हजार कोटी रुपयांचा काळा पैसा आला तो कोणाचा आहे याची चौकशी करण्याची मागणी करत राहुल गांधींनी अदानी-मोदींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्यामुळेच राजकीय आकसातून त्यांच्यावर कारवाई केली, असा आरोप राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केला. राज्याच्या विविघ भागांमध्ये सत्याग्रहाच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्ह्यांत सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सत्याग्रह केला. नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर मुंबईत विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नसिम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी सहभागी झाले होते.

काँग्रेस इंग्रजांना घाबरली नाही, ‘यांनाकाय घाबरणार

नागपूर : काँग्रेस इंग्रजांना घाबरली नाही तर ‘यांना’ काय घाबरणार? भाजप विरोधातले आंदोलन आणखी तीव्र करणार आहे. भाजपच्या हुकूमशाहीविरोधात आजपासून आम्ही सत्याग्रह आंदोलन करू, असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने अवमानप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि लोकसभा सचिवालयाने तातडीने पावले उचलत त्यांचे सदस्यत्व रद्द केले.

काँग्रेसने हे भाजपचे षडयंत्र असल्याचे सांगून रविवारी आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. पटोले म्हणाले, सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि ते इंग्रजांकडून निवृत्तिवेतन (पेन्शन) देखील घेत होते. त्याची अनेक कागदपत्रे उपलब्ध आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. चोराला चोर म्हणणे चुकीचे?  चोराला चोर म्हणणे चुकीचे असेल तर ही चूक आम्ही वारंवार करू, अशा शब्दांत पटोले यांनी संताप व्यक्त केला. भाजपची हुकूमशाही प्रवृत्ती आहे. त्यांना वाटते ते सत्तेचा ताम्रपट घेऊन आले आहेत, असेही पटोले म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 03:02 IST
Next Story
पाडवा मेळाव्यातील टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदे राज यांच्या भेटीला; मशिदीवरील भोंग्यावर नियमानुसार कारवाई -शिंदे
Exit mobile version