मुंबई : राज्यातील विविध सरकारी विभागांकडे कंत्राटदारांची तब्बल ८६ हजार कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित असताना, महायुती सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या थकीत देयकांसाठी ५ हजार कोटींची तातडीची तरतूद केली आहे. कंत्राटदारांच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, इमारत दुरुस्तीसाठी आणखी ७०० कोटी रुपये देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, जलजीवन मिशन आणि आदिवासी विकास विभागाची १,३२० कोटींची देणी दिवाळीपूर्वी चुकती करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.
राज्य सरकारच्या विविध विभागांकडून मोठ्या प्रमाणात देयके प्रलंबित असल्याने महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेने (एमएससीए) ३० ऑक्टोबरपासून ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना फोन करा’ आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनांतर्गत राज्यातील हजारो कंत्राटदारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालये तसेच मंत्र्यांना दूरध्वनी करून त्यांचे थकीत देयकांच्या रकमेकडे लक्ष वेधले. या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कंत्राटदारांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ५ हजार कोटी रुपये थकीत बिलांसाठी वितरीत करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत या आर्थिक वर्षात ९ हजार ७०० कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.
दरम्यान, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी कंत्राटदारांच्या शिष्टमंडळाला आदिवासी विकास विभागाकडील थकीत बिलांपोटी ५६० कोटी रुपये दिवाळीपूर्वी अदा करण्यात येतील, असे आश्वासन दिले. ही देयके वर्षभरापेक्षा अधिक काळ प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत थकीत देयके अदा करण्याकरिता ७६० कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून वित्त विभागाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आल्याचे स्पष्ट केले. ही रक्कमही दिवाळीपूर्वी उपलब्ध होण्याची अपेक्षा असल्याचे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेचे मिलिंद भोसले यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ते आणि पुलांची कामे करणाऱ्या सर्वसाधारण कंत्राटदारांची गेल्या पाच वर्षांतील सुमारे १७,५०० कोटी रुपयांची देयके थकीत होती. त्यापैकी पाच हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. इमारत दुरुस्तीच्या कामांसाठी आणखी ७०० कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच जलजीवन मिशन आणि आदिवासी विकास विभागाकडून १,३२० कोटी रुपये मिळण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे कंत्राटदारांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे भोसले म्हणाले.
कंत्राटदार संघटनेच्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या विविध विभागांकडे कंत्राटदारांची सुमारे ८६ हजार कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुमारे २७ हजार कोटी रुपये, जलजीवन मिशनकडे ३८ हजार कोटी रुपये, ग्रामीण विकास विभागाकडे ३,५०० कोटी रुपये, आदिवासी विकास विभागाकडे १२ हजार कोटी रुपये आणि पर्यटन विभागाकडे २,५०९ कोटी रुपये थकीत आहेत. याशिवाय जलसंपदा, जलसंधारण आणि नगरविकास विभागांकडील देयकेही प्रलंबित आहेत.
