मुंबई: दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असतानाच हा दुष्काळ राज्यातील सहकारासम्राटांसाठी मात्र पर्वणी ठरला आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणूक स्थगित करण्यात आलेल्या सहकारी संस्थांवर आता प्रशासक नियुक्ती न करता विद्यमान संचालक मंडळालाच मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना, सहकारात सम्राट यांना यंदाची दिवाळी पावली असून मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. जिह्याच्या राजकारणाची आर्थिक सत्ता मानल्या जाणाऱ्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, त्याचप्रमाणे सहकारी साखर कारखाने, पतसंस्था, सहकारी बँका, सूतगिरण्या, बाजार समित्या, पणन संघ अशा विविध ४ ते ५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. तर पुढील दोन महिन्यात आणखी २० हजार संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. मात्र राज्यात ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्हयातील सहकारी संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यामुळे या संस्थांवर प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सहकार आयुक्तांनी सुरु केली असतानाच आता विद्यमान संचालक मंडळालाच मुदतवाढ देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

त्यानुसार ज्या सहकारी संस्थांनी त्यांची निवडणूक घेण्यासाठी प्रारूप मतदार यादीसह निवडणूक निधी जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. तथापि, सरकारने दुष्काळामुळे निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. तरीही सहकार कायद्यातील तरतुदीनुसार या संस्थांच्या संचालक मंडळाची कोणतीही चूक नसताना प्रशासक नेमला जाऊ शकतो. दुष्काळाची व्याप्ती लक्षात घेता अशा संस्थांवर दीर्घकाळ प्रशासक कार्यरत राहील, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा संस्थांवर प्रशासक नियुक्ती करणे संयुक्तिक ठरणार नाही. या कारणास्तव राज्यातील अशा अ प्रकारातील आणि दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे अशा संस्थांवर प्रशासकांची नियुक्ती न करता विद्यमान संचालक मंडळालाच पुढे कामकाज करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळामुळे राज्यात आता किमान सहा महिने कोणत्याही सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार नसून त्या पुढील वर्षी सप्टेंबर नंतर होतील. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला किमान वर्षभर अधिकचा कालावधी मिळणार आहे.