दशकोटी लसीकरण ! ; राज्याचे यश ; मोहीम गतिमान करण्याचे आव्हान कायम

राज्यात सोमवारी सायंकाळपर्यंत ९ कोटी ९६ लाख ६९ हजार इतके लसीकरण झाले होते.

मुंबई : महाराष्ट्राने करोना प्रतिबंधक लसीकरणाचा दहा कोटींचा टप्पा मंगळवारी पार केला. देशभरात ११० कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून, उत्तर प्रदेशनंतर लसीकरणात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. मात्र, मंदावलेली ही मोहीम गतिमान करण्याचे सरकारपुढील आव्हान कायम आहे.

राज्यात जूनमध्ये प्रतिदिन सरासरी तीन लाख ३२ हजार लसीकरण झाले होते. लशीची उपलब्धता वाढल्यानंतर जुलैमध्ये प्रतिदिन सरासरी तीन लाख ९१ हजार, तर ऑगस्टमध्ये चार लाख ६७ हजार इतके लसीकरण झाले. सप्टेंबरमध्ये दैनंदिन सरासरी सात लाख ६० हजार इतके लसीकरण झाले. मात्र लसीकरणाचा वेग थोडा मंदावला आणि ऑक्टोबरमध्ये दैनंदिन सरासरी पाच लाख ३६ हजार इतके लसीकरण झाले. राज्यात सर्वाधिक लसीकरण८ सप्टेंबरला १५ लाख ३ हजार इतके झाले होते. त्यापाठोपाठ १३ सप्टेंबरला १३ लाख ८७ हजार, १७ सप्टेंबरला १२ लाख ५६ हजार इतके लसीकरण झाले होते.

राज्यात सोमवारी सायंकाळपर्यंत ९ कोटी ९६ लाख ६९ हजार इतके लसीकरण झाले होते. अखेर मंगळवारी राज्याने दहा कोटींचा टप्पा ओलांडला. मुंबईत सुमारे १ कोटी ४५ लाख, पुणे जिल्ह्य़ात एक कोटी २३ लाख, ठाणे जिल्ह्य़ात सुमारे ८५ लाख लसीकरण झाले आहे.

लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विभागाला दिले होते. राज्यात नवरात्रोत्सवात ‘कवचकुंडले’ अभियान राबविण्यात आले. काही महापालिकांनी घरोघरी जाऊन लसीकरणास सुरुवात केली. करोना लशीची एक मात्रा घेतल्यानंतर दुसरी मात्रा घेण्यास अनेकांनी निरुत्साह दाखविला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी लसीकरण न केल्यास ठाणे महापालिकेसह काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेतन थांबविण्याचे इशारे दिले आहेत.कोव्हिशिल्ड लशीची पहिली मात्रा घेतल्यानंतर दुसरी मात्रा ८४ दिवसांनी घेता येते. लसीकरण वाढविण्यासाठी आणि लशींचा मुबलक पुरवठा होत असल्याने हा कालावधी कमी करण्याची विनंतीही राज्य सरकारने केंद्र सरकारला केली आहे. राज्य सरकारने लसीकरण वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न आणि नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी पावले उचलली असल्याने राज्याने १० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातून हे शक्य झाले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशच्या तुलनेत..

देशात सर्वाधिक म्हणजे साडेतेरा कोटी लसीकरण उत्तर प्रदेशात झाले आहे. या राज्याची लोकसंख्या सुमारे २४ कोटी आहे. लसीकरणात महाराष्ट्र (१० कोटी दीड लाख) दुसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे सव्वाबारा कोटी आहे. म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रातील लसीकरणाचे प्रमाण अधिक आहे.

लस आलेख

* देशात आतापर्यंत सुमारे ११० कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. सुमारे ७५ कोटी नागरिकांना पहिली लसमात्रा मिळाली आहे. त्यातील ३५ कोटी नागरिकांना दोन्ही लसमात्रा मिळाल्या आहेत.

* भारताने २१ ऑक्टोबर रोजी १०० कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी १७ सप्टेंबरला दैनंदिन सर्वाधिक म्हणजे अडीच कोटी लसीकरण झाले होते.

* अलीकडे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. मंगळवारी दिवसभरात ५३ लाख लसमात्रा देण्यात आल्या.

* राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे १५.९२ कोटी लसमात्रा उपलब्ध आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली.

मुंबईतील स्थिती..

मुंबईत मंगळवापर्यंत एक कोटी ४५ लाख इतके लसीकरण झाले. त्यात पालिका आणि शासनाच्या केंद्रांवर मिळून ८८ लाख, तर खासगी केंद्रांवर ५७ लाख लसमात्रांचा समावेश आहे. ८९ लाख ७९ हजार १८१ जणांनी पहिली लसमात्रा घेतली असून, त्यातील ५५ लाख ४३ हजार ८७९ जणांनी दोन्ही लसमात्रा घेतल्या आहेत.

राज्याने १० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला, ही अभिमानास्पद बाब आहे. आता लसीकरण १०० टक्के पूर्ण करणे हे आपले पुढील लक्ष्य असायला हवे.

डॉ. राहुल पंडित, करोना कृती दलाचे सदस्य

लसीकरणामुळेच गणेशोत्सव, नवरात्रीनंतर करोनाच्या साथीचा मोठा उद्रेक झाला नाही. मात्र, मुंबईसह काही जिल्ह्यंमध्ये मोठय़ा प्रमाणात लसीकरण झाले असले तरी अनेक जिल्ह्यंत अद्यापही पहिली मात्रा न घेतलेल्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे पहिल्या मात्रेबरोबरच दुसऱ्या मात्रेसाठी लसीकरण मोहीम गतिमान केल्यानंतरच आपल्याला तिसऱ्या मात्रेकडे वळता येईल.

डॉ. शशांक जोशी, करोना कृती दलाचे सदस्य

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra crosses 10 crore corona vaccination mark zws

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख