मुंबई : युट्यूबर रणवीर अलाहबादियाने केलेल्या वादग्रस्त टिप्पणीबद्दल महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी रणवीर, समय रैनासह ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा याप्रकारणतील दुसरा गुन्हा असून यापूर्वी गुवाहाटी पोलिसांनी याप्रकारणी गुन्हा दाखल केला होता.

नुकत्याच झालेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमाच्या एका भागात अलाहबादियाने वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी तो परीक्षक म्हणून उपस्थित होता. त्याच्यासह इतर लोकप्रिय आशय निर्माता अशिष चंचलानी, जसप्रीत सिंह आणि अपूर्वा मुखीजाही उपस्थित होते. अलाहबादियाने एका स्पर्धकाशी संभाषण करताना वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्यामुळे त्याच्यावर समाज माध्यमांवर टीका झाली आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. ते वादग्रस्त विधान अश्लील असून त्यामुळे महिलांचाही अपमान झाला आहे. पोलिसांनी आयोजक, ऑनलाइन प्लॅटफॉर्म, कलाकार आणि संबंधित इतरांवर गुन्हा दाखल करावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. अखेर महाराष्ट्र सायबर विभागाने याप्रकारणी गुन्हा दाखल केला.

मुंबई पोलिसांनाही याप्रकारणी तक्रार प्राप्त झाली असून ते याप्रकारणी प्राथमिक चौकशी करीत आहेत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही आणि ते याप्रकरणी चौकशी करीत आहेत. याप्रकरणी उपायुक्त दिक्षीत गेदाम यांना विचारले असता आम्ही चौकशी करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली होती.

दरम्यान, याप्रकरणी आसाममध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिासंनी अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करायचा की नाही, याची पडताळणी करण्यासाठी सध्या मुंबई पोलीस प्राथमिक चौकशी करीत आहेत. त्यासाठी रणवीर व समय यांच्याकडून माहिती घेण्यासाठी त्यांना खार पोलिसांनी बोलावले आहे.

Story img Loader