त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवर ३६ प्रक्षोभक मजकूर ; महाराष्ट्र सायबर विभागाचा अहवाल

गेल्या दीड वर्षांत १० हजार ७६ आक्षेपार्ह पोस्ट शोधल्या असून त्या हटवण्याची शिफारस करण्यात आली होती.

मुंबई : त्रिपुरा घटनेचे पडसाद राज्यातही काही ठिकाणी उमटले असताना महाराष्ट्र सायबर विभागाने ट्वीटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवरील ३६ प्रक्षोभक मजकूर शोधून काढले आहेत. त्याबाबत संबंधित कंपन्यांना हा मजकूर हटविण्याची विनंती महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आली आहे. मुंबई, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, नाशिक या ठिकाणांवरून हा मजकूर समाजमाध्यमांवर टाकण्यात आल्याचे तांत्रिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस विभागांना कळण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र सायबर विभागाने केलेल्या तपासणीत ट्वीटरवर २५, फेसबुकवर सहा, इन्स्टाग्रामवर पाच प्रक्षोभक, चुकीच्या माहिती देणाऱ्या, धार्मिक तेढ निर्माण करणारा मजकूर सापडले आहेत. याबाबत संबंधित कंपन्यांना महाराष्ट्र सायबर विभागाने माहिती देऊन हा मजकूर हटवण्याची सूचना केली आहे. याबाबत एक सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे.

आयपी अ‍ॅड्रेसच्या तपासणीत यातील बहुसंख्य मजकूर मुंबईतून टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासणीत ३६ पैकी २५ मजकूर मुंबई पोलिसांच्या हद्दीतील असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्याशिवाय अमरावतीतून सात, कोल्हापूरमधून एक, नांदेडमधून एक, नाशिक ग्रामीणमधून एक व एक अनोळखी ठिकाणावरून असा एकूण ३६ मजकूर समाज माध्यमांवर टाकण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये तो समाजमाध्यमांवर टाकण्यात आला आहे. त्याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसला, तरी संबंधित पोलीस विभागांना याबाबतची माहिती देण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या दीड वर्षांत १० हजार ७६ आक्षेपार्ह पोस्ट शोधल्या असून त्या हटवण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यातील चार हजार ९७७ मजकूर हटवण्यात आला आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजे सात हजार १४५ मजकूर ट्वीटरवरील, ९३० मजकूर इन्स्टाग्रामवरील, १५९४ मजकूर फेसबुकवरील, २७४ यूटय़ुबवरील चित्रफिती, १०३ टिकटॉक व १९ इतर ठिकाणचा मजकूर आहे. याबाबत राज्यभरात आतापर्यंत ७५ गुन्हे व २७ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याप्रकरणी ७२ जणांना अटक करण्यात आली असून ६२ आरोपींचा अद्याप शोध सुरू आहे. त्यातील काहींची ओळखही पटवण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर प्रक्षोभक मजकुरावरून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेनेही समाजमाध्यमांवर बारीक लक्ष ठेवले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra cyber department report on provocative texts on tripura incident zws

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या