मुंबई: राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात अति मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सर्वत्र समाधानकारक पाऊस असताना शहरांना आणि गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मात्र आजही पुरेसा पाऊस पडत नाही. त्यामुळे पिण्याचे पाण्याची संकट आजही गहिरे आहे. राज्यातील १३८ धरण क्षेत्रामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे केवळ २५ टक्के पाणीसाठा या धरणांमध्ये आह. त्यामुळे बाहेर किती पाऊस पडत असला तरी पिण्याचे पाणी जपून वापरा असा राज्य सरकारचा सल्ला आजही कायम आहे. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही तर पुढील वर्षी पाणीटंचाई अटळ आहे. असे जलसंपदा विभागातील अधिकारी का म्हणत आहेत ते वाचा काय स्थिती आहे धरण क्षेत्रातली.

राज्यातील बहुतांशी भागात मुसळधार पाऊस पडत आहे मात्र पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पावसाचे प्रमाण अद्याप समाधानकारक नाही. धरणांमध्ये केवळ २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून हे प्रमाण गेल्या वर्षी पेक्षा तुलनेने फारच कमी आहे. जून महिन्यात पावसाने घेतलेली ओढ या कमी पाणीसाठयाला कारणीभूत आहे. धरण क्षेत्र पुरेस भरण्यासाठी त्या क्षेत्रात किमान तीन आठवडे संततधार पाऊस पडण्याची आवश्यकता असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.

राज्यात तीन हजार मोठी, मध्यम आणि लघु धरणे आहेत. पिण्याच्या पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी महत्त्वाची १३८ मोठी धरणे राज्याच्या जलव्यवस्थेचा मुख्य आधार आहेत. यंदा मान्सून उशिरा सक्रिय झाल्यामुळे जूनअखेरपर्यंत अनेक धरणांमध्ये केवळ २२ ते २३ टक्के पाणीसाठा होता. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. ही सर्व धरणे भरून निघण्यासाठी केवळ दोन-तीन दिवसांचा पाऊस पुरेसा नाही. त्यासाठी सलग दोन ते तीन आठवडे या धरण क्षेत्रात पाऊस पडणे आवश्यक आहे.

जलसाठयात पाणीसाठा कमी होईल तेवढे पुढील वर्षीचे पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरांमध्ये खूप पाऊस पडत आहे. याचा अर्थ पाणीसाठा पुरेसा निर्माण होत आहे, असे काही नाही अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. कोयना, उजनी, भाटघर, पानशेत, वरसगाव, भामा-आसखेड, जायकवाडी, गंगापूर, दारणा आणि इतर मोठ्या धरणांच्या कॅचमेंटमध्ये (धरण पाणलोट क्षेत्र) सातत्यपूर्ण पर्जन्य आवश्यक आहे. हे कालावधीचे अंदाज असून प्रत्यक्ष भराव पावसाची तीव्रता, जलग्रहण क्षेत्रातील पर्जन्यमान आणि प्रवाहावर अवलंबून असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.