मुंबई : राज्यात जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे बहुतेक धरणे भरून वाहिली होती. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसात मोठा खंड पडल्यामुळे आणि वाढत्या तापमानामुळे धरणांतील पाणीसाठा कमी होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १३.७५ टक्के इतका कमी पाणीसाठा धरणांमध्ये आहे. यंदा आतापर्यंत क्षमतेच्या ७५.२५ टक्के पाणीसाठा आहे, तर गतवर्षी ८८.८२ टक्के पाणीसाठा होता. मराठवाडा विभागात सर्वांत कमी ४४.९२ पाणीसाठा आहे. राज्यभरात दुष्काळी स्थिती असली तरीही मराठवाड्यात तीव्र पाणी टंचाई जाणविण्याची चिन्हे आहे.
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरीच्या तुलनेत १९ टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यात पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरी ९९४.५ मिमी पाऊस पडतो, यंदा ८०४.४ मिमी पाऊस पडला आहे. जून महिन्यात मोसमी पाऊस सक्रीय झाला नाही, जुलै महिन्यांत मोसमी पाऊस सक्रीय होऊन राज्यात सर्वदूर पाऊस झाला. या पावसामुळे राज्यातील बहुतेक धरणे भरून वाहिली. त्यामुळे किमान पिण्याच्या पाण्याची तरी चिंता मिटली आहे. पण, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसात खंड पडल्यामुळे धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होताना दिसत आहे. त्याच बरोबर विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. सोलापूर पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्यांत विहिरी, बोअरवेलचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील मध्यम, लहान प्रकल्प कोरडे
मराठवाड्यातील सर्व प्रकारच्या धरणात फक्त ४४.९२ टक्के पाणीसाठा आहे, गतवर्षी ८२.७६ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत ३७.८३ टक्के इतका कमी पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ४४ मोठे प्रकल्प असून, त्यात ६०.८६ टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांची संख्या ८१ असून, त्यात फक्त २३.६९ टक्के पाणीसाठा आहे. लघु प्रकल्पांती संख्या ८०४ असून, त्यात १६.४१ टक्केच पाणीसाठा आहे. मोठे प्रकल्प वगळता अन्य प्रकल्प कोरडे आहेत, अशीच स्थिती ऑक्टोंबरच्या सुरुवातीला निर्माण झालेली आहे.
राज्यातील विभागनिहाय यंदाचा, गतवर्षीचा पाणीसाठा
विभाग यंदाचा पाणीसाठा गतवर्षीचा पाणीसाठा (टक्क्यात)
नागपूर ७३.०२ टक्के (८८.०८)
अमरावती ६३.४२ टक्के (८५.५६)
छत्रपती संभाजीनगर ४४.९२ टक्के ( ८२.७६)
नाशिक ८२.४४ टक्के (८४.७०)
पुणे ८६.८९ टक्के (९३.२३)
कोकण ९१.१० टक्के ( ९३.७४)
एकूण ७५.२५ टक्के (८८.८२)
संभाव्य परिस्थितीला समोरे जाण्यास सज्ज
सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत नियोजन केले आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे. रब्बी हंगामासाठीच्या आवर्तना बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. ग्रामीण भागासह, शहरांमध्ये पाणी जपून वापरावे लागणार आहे. परतीचा किंवा वादळी पाऊस न झाल्यास टंचाईची स्थिती असलेल्या भागाला अन्य ठिकाणांहून पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. सरकार सर्व संभाव्य परिस्थितीला समोरे जाण्यास सज्ज आहे, अशी माहिती मदत व पुर्नवसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली.
मोठ्या धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती चांगली
राज्यातील मोठ्या धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती मध्यम आणि लघु धरण प्रकल्पांच्या तुलनेत चांगली आहे. त्यासह मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या मोठ्या शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाण्याची स्थितीही समाधानकारक आहे. गोसीखुर्द (९६.४५ टक्के), निम्न वर्धा (८२.४२ टक्के), ऊर्ध्व वर्धा (५८.६६ टक्के), जायकवाडी (७९.९९ टक्के), भंडारदरा १०० टक्के, वैतरणा ९७.९३ टक्के, कोयना ९४.४६ टक्के आणि उजनी ९०.६५ टक्के, मध्य वैतरणा ९९.३६ टक्के, भातसा ९८.८१ टक्के आणि तानसा प्रकल्पात ९५. ८९ टक्के पाणीसाठा आहे.
